क्रांतीज्योती सावित्रीमाई भारतीय स्त्री स्वातंत्र्याचे उगमस्थान

Google search engine
Google search engine

कवयित्री सरिता पवार यांचे जागर व्याख्यानमाला , कुरुंदवाड येथे प्रतिपादन

कणकवली : ज्ञानाच्या किल्ल्या आमच्या कंबरेला आहेत हा मूठभर उच्चवर्णीयांचा अहंकार ठेचून काढण्यात फार मोठी परिवर्तननिष्ठ भूमिका पार पाडणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या निःसंशयपणे भारतीय स्त्री स्वातंत्र्याचे उगमस्थान आहेत असे प्रतिपादन सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कवयित्री सरिता पवार यांनी केले. साधना मंडळ कुरुंदवाड आणि राष्ट्र सेवा दल कुरुंदवाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागर व्याख्यानमालेत कवयित्री सरिता पवार यांचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील सावित्रीमाईच्या पाऊलखुणा शोधताना या विषयावर व्यख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानमाले दरम्यान चौथ्या पुष्पात आपले विचार मांडताना सरिता पवार यांनी सावित्रीबाई फुले यांचा दिडशे वर्षांपूर्वीच्या भारतीय स्त्रीच्या आयुष्यातील स्वातंत्र्याची कवाडे खुली करतानाचा संघर्ष आणि आजची सामाजिक परिस्थिती उपस्थित श्रोत्यांसमोर शब्दबद्ध केली. यावेळी आपले विचार मांडताना त्या म्हणाल्या,

सावित्रीबाई जरी आयुष्यभर ज्योतिबांच्या आचार विचारांवर चालत राहिल्या तरीही त्या सदैव पती अनुगामी होत्या असं म्हणणं म्हणजे त्यांच्या स्वतंत्र व्यक्तित्वावर अन्याय करण्यासारखं आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनांचा मागोवा घेतला तर त्यांचं स्वयंप्रकाशी असणं आपल्याला उमगत जातं. म्हणूनच भारतीय स्त्रीचे मार्गदाते आणि विमोचन म्हणून महात्मा फुले यांचे स्थान जसे अढळ आहे तशाच स्त्री जागरणाचा पहिला प्रभावी हुंकार आणि स्त्री-जाणिवांचा पहिला निर्भय उद्गार म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होय.मानवमुक्तीच्या या कार्यात फुले दाम्पत्याने सोसलेल्या खस्ता समतेची लढाई प्रखर करणाऱ्या होत्या. प्रसंगी स्त्री म्हणून सावित्रीबाईंना जोतिरावांपेक्षाही तीव्र मानसिक अवहेलनांना सामोरे जावे लागले. तरीही किंचितही कच न खाता अंतरातील हाकेला प्रतिसाद देऊन हेटाळणीची परिसीमा सोसूनही सावित्रीबाईंनी मुलींना शिकविण्यासाठी घराच्या उंबरठ्याबाहेर टाकलेले पाऊल हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची खरी सुरुवात होय. यावेळी विचारमंचावर साधना मंडळाचे अध्यक्ष सदाशिव सुभेदार ,जयपाल बलवान, अब्बास पाथरवट,महावीर पौमाजे, खुतबुद्दिन दानवाडे,भूपाल दिवटे,अल्लाउद्दीन दानवाडे, महावीर कडाळे,श्रीकांत चव्हाण, संतोष जुगळे,दीपक पाटील,वैभव उगळे,दीपक परीट,नितीन खांडेकर,
बाबासाहेब नदाफ आदी उपस्थित होते.
साधना मंडळ आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने गेली 30 वर्षे लोकप्रबोधन करण्यासाठी जागर व्याख्यानमाला सुरू आहे. यावर्षीच्या व्याखानमालेचे शुभारंभपुष्प साहित्य अकादमीचा अनुवादासाठी चा पुरस्कारप्राप्त ख्यातनाम लेखिका सोनाली नवांगुळ यांनी गुंफले.तर व्याखानमालेची सांगता ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या व्याख्यानाने होणार आहे.