पावसाच्या हजेरीने शेतकरी सुखावला…!

वार्तापत्र -कोकण संतोष वायंगणकर.

भातशेती करण्याला खास पंधरा दिवस गावाकडे येणारा चाकरमानी दुर्मिळ झाला आहे. शेतात काम करण्याची, राबण्याची अनेकांची सवय मोडली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे शहरातून मुद्दाम होऊन शेती कामासाठी गावात येणारे फारच कमी. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मठबुद्रुक ता.मालवण येथील राजू परूळेकर यांच्या कुटुंबातील तरूण व वृद्ध सारेच तब्बल पंधरा दिवस शेतात राबतात. विशेष म्हणजे यातील अनेकजण हे मुंबईत शहरात रहातात. काही अगदी परदेशात रहाणारी तरूण पिढीही केवळ हौस आवड म्हणून शेतात राबतात. कोकणातील काही गावातील काही मोजक्या कुटुंबातील असे सकारात्मक चित्र आजही पहायला मिळते…

 

यावर्षी शेती कशी होईल. पाऊसच गायब झाला आहे. नाचणी, भात लागवड कशी करायची अशा चिंतेत असणाऱ्या शेतकऱ्याला जुलै महिन्यात झालेल्या पावसाच्या दमदार हजेरीने बळीराजाच्या अनेक प्रश्नांची आणि चिंतेची उत्तर आपोआप सापडली आहेत. यावर्षी कोकणातील आंबा, काजू, कोकम, नारळ, सुपारी बागायतदार अगोदरच आंबा, काजूचे पिक कमी झाल्याने संकटात सापडला होता. कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने जरूर हात दिला असला तरीही शेवटी शेतकऱ्याच झालेलं नुकसान सरकारच्या भरपाईने कधीच भरून येत नाही. परंतु तरीही शेतकऱ्याला मिळणारा तो थोडाफार दिलासा असतो. त्यामुळे ती नुकसान भरपाई तुटपुंजी असली तरीही कोकणातील शेतकरी कधीही त्यावर फार त्रागा न करता जे मिळतय ते स्विकारून शांत, समाधानी रहाणे महत्वाच मानतो. जुलै महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात दमदार पुरागमन केलेल्या पावसामुळे रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खरीप हंगामाला मोठा दिलास मिळाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात लागवडीचे क्षेत्र जरी कमी झाले असले तरीही कोकणातील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आजही भातशेती मोठ्याप्रमाणावर केली जाते. कोकणातील रायगड जिल्ह्यात तर फार पूर्वीपासूनच भातशेती मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. रायगड हे भाताच आगर म्हणूनच ओळखलं जातं. पारंपारिक आणि नवीन संकरित भात बियाण्यांचा वापर आता सर्वत्रच होत आहे. कमी कष्टात कमी कालावधीत आणि या भातशेतीवर होणारा खर्च कमी करून अधिक उत्पन्न घेण्याच नव तंत्र अवलंबिले जात आहे. पारंपारिक भातबियाण्यांचा वापर टाळून नवीन भात बियाणांची पेरणी करून अधिक उत्पन्न घेतले जात आहे. भातशेती बरोबरच कोकणात नाचणी, बरक ही देखिल पिक पूर्वी घेतली जायची. आतातर नाचणी, कुळीथ, उडीद यावरही शेतकरी अधिकचा भर देत आहेत. जेणेकरून कोकणातील शेतकरी फार पूर्वीपासून त्याला वर्षभरात कुटुंबाला लागणार धान्य पिकवण्याची एक सवयच लागून गेली आहे. कोकणातील जनतेला भात आणि मासे यावरच कोकणातील पूर्वपिढी वाढली आहे. त्यामुळे भातशेती ही तर फार कोकणात फार जिव्हाळयाचा विषय होता. परंतु गेल्याकाही वर्षांमध्ये भातशेतीवर होणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न याचा कोणताही ताळमेळ बसत नाही. त्यामुळे काहीनी भातशेती सोडली. यामुळेच भातशेतीचे बरेचसे क्षेत्र पडिक जमिन क्षेत्र झाले आहे. ही पडिक शेती कोकणातील सिंधुदुर्गात अधिक झाली आहे. पूर्वी प्रत्येक कुटुंबातील सर्वच सदस्य एक-दोन नव्हेतर तब्बल पंधरा दिवस शेतात राबायचे आणि भातशेती करायचे. परंतु अलिकडे गावातील कुटुंबातील जवळपास सर्वच काही मोजके वयोवृद्ध वगळून सगळेच पुणे, मुंबई च्या शहरी भागात आहेत. भातशेती करण्याला खास पंधरा दिवस गावाकडे येणारा चाकरमानी दुर्मिळ झाला आहे. शेतात काम करण्याची, राबण्याची अनेकांची सवय मोडली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे शहरातून मुद्दाम होऊन शेती कामासाठी गावात येणारे फारच कमी. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मठबुद्रुक ता.मालवण येथील राजू परूळेकर यांच्या कुटुंबातील तरूण व वृद्ध सारेच तब्बल पंधरा दिवस शेतात राबतात. विशेष म्हणजे यातील अनेकजण हे मुंबईत शहरात रहातात. काही अगदी परदेशात रहाणारी तरूण पिढीही केवळ हौस आवड म्हणून शेतात राबतात. कोकणातील काही गावातील काही मोजक्या कुटुंबातील असे सकारात्मक चित्र आजही पहायला मिळते. शेवटी शेतीचे काम करण्यासाठी शेतात राबण्याची जशी मानसिकता हवी तशी ती अशा कष्टाच्या कामाची सवय देखील असणे आवश्यक ठरते. यामुळेही कोकणातील अनेक गावचे भातशेतीचे क्षेत्र पडिक क्षेत्र असलेले दिसते. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असणारी शेती असल्याने सारीच अस्थिरता आहे. यामुळे देखिल शेतात राबणारे हात आता शेतात काम करेनासे झाले आहेत. काही भागातील तरूण शेतीत प्रयोगशिलतेने काही नवीन करण्याचा प्रयत्न निश्चित करताना दिसतात.
एकीकडे आपण शेतीत राबणारी माणस कमी झाली अस म्हणत असताना त्यामागेही अनेक कारण आहेत. वन्यप्राणी तर गावातच रहायला आले आहेत. वाघ,हत्ती, रानडुक्कर, गवारेडा, माकड, कटींदर अशा सर्वच प्रण्यांचा गावातला वावर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे सहाजिकच शेती, बागायती करणाऱ्यांपुढेही या वन्यप्राण्यांचा प्रश्न अधिक मोठा झाला आहे. माकड, गवारेडा हे तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आहे. नारळ, केळी, सुपारी या बागायतींचे अतोनात नुकसान केले आहे. काही भागात हत्तींचा वावर आहे. हत्तींच्या आगमनाने शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभी केलेली बागायती नष्ट होते. दहा-वीस वर्षे कष्ट करून जी बागायत उभी होते त्याच बागायतीत हत्तीने, गवारेड्याने पाऊल टाकल की सारेच संपल असच म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर येते. कोकणातील सगळीकडेच शेतकरी हैराण झालेला आहे. मात्र, यावर्षी पावसाने दमदार सुरूवात केल्याने भात, नाचणी करणारा शेतकरी निश्चितच सुखावला आहे.