शेतकरी बाबू खरात गंभीर जखमी
वैभववाडी प्रतिनिधी :
तुटलेल्या वीजवाहिनीचा धक्का लागून आठ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. तर बारा शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या दुर्घटनेत शेळीपालक शेतकरी बाबू शामू खरात यांनाही विजेचा धक्का बसून ते गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास आचिर्णे येथे घडली.
मिळालेल्या माहितीवरून बाबू खरात हे नेहमीप्रमाणे आपल्या मालकीच्या शेळ्या घेऊन जंगलात गेले. वाडीत जाणारी वीज वाहिनी जंगलात तुटून पडली होती. त्या चालू वीज वाहिनीचा धक्का शेळ्यांना बसला. यात आठ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच मालक बाबू खरात यांनाही वाहिनीचा धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली. जखमी बाबू खरात यांना तातडीने उपचारासाठी ओरोस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी वीज वितरणचे अधिकारी यांनी जाऊन पाहणी केली.
या घटनेमुळे खरात यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तुटलेल्या वीजवाहिन्यांमुळे वारंवार या घटना घडत असल्यामुळे नागरिक व जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित यंत्रणेकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.












