साडवलीत क्षुल्लक कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी; एक तरुण गंभीर जखमी; देवरूख पोलीसात गुन्हा दाखल

देवरूख (प्रतिनिधी)

रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी हळू घेतल्याच्या क्षुल्लक कारणावरून देवरूख नजीकच्या साडवली सह्याद्रीनगर येथे जोरदार वाद होऊन एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे. या घटनेत भांडण सोडवायला आलेल्या भावाच्या कपाळावर दुचाकीच्या बॅटरीने मारहाण करून गंभीर दुखापत करण्यात आली असून, तुम्हाला संपवून टाकीन, अशी धमकीही देण्यात आली आहे.

याबाबत देवरूख पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, ४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास साडवली येथील सह्याद्रीनगर परिसरातील गद्रे यांच्या कंपाउंडजवळील कच्च्या रस्त्यावर ही घटना घडली. फिर्यादी मनिष दीपक बांडागळे (वय २६) हे त्यांच्या आईला सोडण्यासाठी भावाच्या ‘स्प्लेंडर’ दुचाकीवरून (MH 08 BD 1158) जात होते. रस्त्यातील वळणावर मोठा खड्डा असल्याने त्यांनी गाडी हळू करून थांबवली. ​त्याचवेळी समोरून दुचाकीवरून दोन लहान मुलांना घेऊन येणारा आरोपी अनिकेत आत्माराम झगडे याने गाडी थांबवून विनाकारण मनिष यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. घराजवळ चाललेला हा प्रकार पाहून मनिष यांचा भाऊ दिनेश दीपक बांडागळे (वय ३१) हा भांडण सोडवण्यासाठी धावून आला.

मात्र, वाद मिटण्याऐवजी अधिकच ताणला गेला. आरोपी अनिकेत याने तत्काळ आपल्या अन्य साथीदाराला बोलावून घेतले. संशयित आरोपी धर्मेंद्र तानाजी भोपळकर याने हातात असलेल्या दुचाकीच्या लहान बॅटरीने दिनेश बांडागळे यांच्या कपाळावर उजव्या बाजूला जोरदार प्रहार केला. या अचानक झालेल्या हल्ल्यात दिनेश गंभीर जखमी झाला. मारहाणीच्या या घटनेदरम्यान संशयित आरोपी सौ. प्रियंका प्रकाश भोपळकर हिने फिर्यादी मनिष व त्यांच्या आईला अश्लील शिवीगाळ केली. आम्ही येथील खोत आहोत, तुमच्या पूर्ण खानदानाला संपवून टाकीन, अशी धमकीही यावेळी देण्यात आली. या प्रकरणी मनिष बांडागळे यांनी देवरूख पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, ५ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री ०-१३ वाजता पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अनिकेत आत्माराम झगडे, धर्मेंद्र तानाजी भोपळकर, सौ. प्रियंका प्रकाश भोपळकर (सर्व रा. सह्याद्रीनगर, साडवली). या संशयित आरोपीवर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३२४(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.