बांद्यात बेकायदा दारुसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई 

बांदा : प्रतिनिधी 

जुना पत्रादेवी-बांदा रोडवरील आरोसबाग तिठ्याजवळ इनोव्हा गाडीतून होणारी गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक विरोधात एक्साईजच्या इन्सुली पाथकाने कारवाई केली. यात १० लाख २४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाक्यावर करसण्यात आली. याप्रकरणी रितेश प्रभु म्हात्रे (वय ३५, रा, ठाणे) असे त्याचे नाव आहे.

 

राज्य उत्पादन शुल्क इन्सुली नाक्याच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, शुक्रवारी सकाळी ७ वाजता जुना पत्रादेवी-बांदा रोडवर संशयित वाहनांची तपासणी सुरू होती. या दरम्यान इनोव्हा कार (एमएच ४३एजे १८१९) अडवून तपासणी केली असता गाडीच्या मागील सीटवर व डिकीमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे विविध ब्रँड लपवून ठेवल्याचे उघड झाले.

 

या कारवाईत ३० बॉक्समध्ये एकूण ५४० बाटल्या होत्या. यामध्ये ४ लाख २४ हजार ८०० रुपयाची दारू आणि ६ लाख किंमतीची इनोव्हा कार असा एकूण १०लाख २४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

 

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर आणि सिंधुदुर्ग अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक मिलिंद माळी, धनंजय साळुंखे, विवेक कदम तसेच जवान संदीप कदम, दीपक वायदंडे, सागर सूर्यवंशी, सतीश चौगुले आणि अभिषेक खत्री यांनी पार पाडली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक मिलिंद माळी करत आहेत.