२८ महाविद्यालयांतील ५५० हून अधिक कलावंतांचा सहभाग
३१ कलाप्रकारांत रंगणार स्पर्धा
सावंतवाडी । प्रतिनिधी :
मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या सिंधुदुर्ग विभागीय फेरीचे उद्घाटन सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विवेकानंद सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाले.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या महोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २८ महाविद्यालयांतील ५५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले असून, ३१ विविध कलाप्रकारांमध्ये दिवसभर स्पर्धा रंगणार आहेत.
कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य धनेश सावंत व लखमराजे भोसले तसेच मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे उपस्थित होते. यावेळी श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीव देसाई, जिल्हा युवा महोत्सव समन्वयक डॉ. आशिष नाईक आणि डॉ. नितीन वळंजू यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी व्यासपीठावर भोसले नॉलेज सिटीचे सीईओ ले. कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजय जगताप, यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. रमण बाणे तसेच कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. बॉनी शेराव्ह उपस्थित होते.
उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच देवी सरस्वतीच्या प्रतिमेला आणि नटराजाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून युवा महोत्सवाच्या या विभागीय फेरीचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. रमण बाणे यांनी महोत्सवात सहभागी झालेल्या महाविद्यालयांची व विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती दिली.
त्यांनी सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांचे स्वागत करत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. मनोगत व्यक्त करताना लखमराजे भोसले यांनी प्रतिपादन केले की, युवा महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मंच आहे. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना योग्य दिशा मिळते आणि त्यांना आपल्या प्रतिभेचे उत्कृष्ट सादरीकरण करण्याची संधी मिळते.
सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे विशेष कौतुक केले. गेल्या काही वर्षांत विद्यापीठाच्या अंतिम फेरीत सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत आपली वेगळी छाप निर्माण केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. आशिष नाईक आणि ले. कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत युवा महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले.
या विभागीय फेरीत दिवसभर विविध ३१ कलाप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण पाहायला मिळणार आहे. दिवसभराच्या या स्पर्धांनंतर सायंकाळी निकाल जाहीर करण्यात येणार असून, रात्री उशिरा पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि निवेदन अमर प्रभू यांनी केले.











