केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे मच्छिमारांना आश्वासन
गुहागर प्रतिनिधी:
व्हेल माश्याच्या उलटी म्हणजेच अंबर ग्रीस प्रकरणात खा. नारायण राणे आणि खा. विनोद तावडे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन माजी आ. डॉ. विनय नातू यांनी मच्छीमार समाजाने घेतलेल्या भेटीप्रसंगी दिले.
व्हेल माशाची उलटी म्हणजेच अंबर ग्रीस या पदार्थाचा सखोल आणि शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील मत्स्य, वन, संशोधन, शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ञ लोकांनी एक अभ्यास गट स्थापन केला आहे. सदरच्या अभ्यासगटाबरोबर भारतातील राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या मत्स्य संशोधक केंद्राचे मान्यवर शास्त्रज्ञ मार्गदर्शन करीत आहेत. सदरच्या अभ्यास गटाला मार्गदर्शक म्हणून माजी आ. नातू मार्गदर्शन करीत आहेत. तसेच प्रशासकीय आणि राजकीय पाठपुरावा याबाबत मदत करीत आहेत.
मागील काही वर्षांमध्ये व्हेल माशाची उलटी सापडण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच त्याच्या कथित तस्करी बद्दल मच्छिमार तसेच किनारपट्टीतल्या भागातील लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. व्हेल माशाच्या उलटी संदर्भात प्रशासन, मच्छिमार आणि लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात समज गैरसमज
आहेत. आजही व्हेल माशाची उलटी बाबत सत्यता तपासणारी यंत्रणा नाही किंवा त्या यंत्रणेला मर्यादा आहेत. यामुळे कायद्याचा दुरुपयोग, तसेच तस्करी संदर्भात गोष्टी घडत असतात. अंबर ग्रीस हे स्पर्म व्हेल माशापासून उत्पन्न होते अशी प्राथमिक माहिती उपलब्ध आहे. स्पर्म व्हेल हा वन्यजीव प्राणी कायदा संरक्षण कायदा 1972 अंतर्गत येत असल्यामुळे त्याची उलटी अथवा शरीरातून उत्सर्जित होणारा पदार्थ हा पण संरक्षित केला गेला आहे. तो संरक्षित असावा की नसावा याबाबत तज्ञांमध्ये आणि सर्वसामान्य माणसांमध्ये मत मतांतरे आहेत.
यासाठीच सदरच्या अभ्यास गटाने केलेला अभ्यास व संकलित केलेली माहिती ही प्रशासनाकडे सुपूर्द केली गेली आहे. व्हेल माशाच्या उलटी संदर्भात कायद्यातील तसेच धोरणातील बदल यासाठी त्याचा उपयोग होईल, याचा अभ्यास गटाला विश्वास आहे. अभ्यास करताना मच्छिमार पारंपारिक ज्ञानाचा पण वापर केला जाणार आहे. संबंधित विषयात कायद्यामधील बदल व इतर अनुषंगिक बदलासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे असे डॉ. नातू यांनी सांगितले. तसेच राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना पण आवश्यक बाबींची माहिती दिल्याचे सांगितले. या विषयात पुढाकार घेतल्याबद्दल डाँ. नातू यांचे मच्छिमारांनी आभार मानले. यावेळी चिपळूण येथील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद तोरसकर उपस्थित होते.











