पडीक जमिनीवर फुलले समृद्धीचे स्वप्न!

▪️काळसे येथे ३ एकर क्षेत्रात एकाच दिवशी भात लावणी केली पूर्ण   

▪️कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीने ग्रामस्थ उत्साहित 

▪️ परंपरा, आधुनिक शेती आणि सामूहिक प्रयत्नांचा प्रेरणादायी संगम

 

मसुरे | झुंजार पेडणेकर :संघटित प्रयत्नांमुळे अशक्य गोष्टही कशी शक्य होते, याचा एक आदर्श वस्तुपाठ मालवण तालुक्यातील काळसे येथील प्रगत शेतकरी गटाने घालून दिला आहे. पाणी फाउंडेशन आयोजित ‘फार्मर कप’ स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या गटाने “भात लावणी महोत्सवांतर्गत” तब्बल तीन एकर पडीक जमिनीवर एकाच दिवसात भात लावणी पूर्ण केली. शालेय विद्यार्थी, कृषी अधिकारी आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून राबवण्यात आलेला हा अनोखा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.

पडीक असलेल्या आणि उत्पन्न न देणाऱ्या जमिनीचा कायापालट करण्याचा ध्यास काळसे येथील या शेतकऱ्यांनी घेतला होता. ‘फार्मर कप’ स्पर्धेमध्ये सहभागी गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ‘प्रगत शेतकरी गट’ स्थापन केला. या गटाने केवळ कागदावर नियोजन न करता थेट शेतात उतरून तीन एकर पडीक जमीन लागवडीयोग्य केली. यासाठी उपकृषी अधिकारी धनंजय गावडे यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रगत शेतकरी बचत गट, काळसे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला शेतकरी, महिला भगिनी, ग्रामस्थ आणि कृषी क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

चिखलाने माखलेले हात, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि शेती गीतांच्या सुरांनी भारलेले वातावरण यामुळे संपूर्ण परिसरात खऱ्या अर्थाने ‘मातीचा उत्सव’ साकारला….

▪️श्री पद्धतीने भात लागवड –

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे श्री पद्धतीने भात लागवडीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत कमी खर्चात, योग्य नियोजनातून आणि शाश्वत पद्धतीने भात उत्पादन घेण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी तसेच सत्यमेव जयते फार्मर कप २०२६, पाणी फाउंडेशन तथा कृषी विभागाचे मेंटोर श्री. धनंजय गावडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. गावडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत आधुनिक शेती पद्धती, सामूहिक प्रयत्न, जलसंधारण, उत्पादन खर्च कमी करणे आणि शेती अधिक सक्षम व शाश्वत करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण झाला.

▪️पर्यटक, लोकप्रतिनिधी अधिकारी, शिक्षक, विध्यार्थी, ग्रामस्थ उतरले शेतीत –

सदर कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी कणकवली उमाकांत पाटील , माजी जि प अध्यक्ष श्री काका कुडाळकर , धामापूर सरपंच सौ परब मॅडम, काळसे सरपंच काळसेकर मॅडम, आत्मा अध्यक्ष श्री प्रताप चव्हाण ,डॉ. काळसेकर , सौ माधुरी कुडाळकर, आनंदाश्रय अणावाचे संस्थापक श्री बबन परब, शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी संतोष गावडे , उद्यान पंडित पुरस्कार विजेते श्री उत्तम फोंडेकर , माजी सभापती राजेंद्र परब, गटाचे अध्यक्ष श्री श्यामसुंदर मालवणकर तसेच उप कृषी अधिकारी श्री धनंजय गावडे ,कृषी सेविका श्रीमती स्नेहा खोत ,ग्राम विकास अधिकारी सौ शेलटकर , माजी विस्तार अधिकारी श्री विनायक चव्हाण तसेच शंभरहून अधिक भात लावणी इच्छुक शेतकरी तसेच पर्यटक उपस्थित होते. या कार्यक्रमात काळसे हायस्कूलची 25 मुले शेतीचा आनंद घेण्यासाठी शेतात उतरली होती. त्यांच्यासोबत त्यांच्या शिक्षिका मोरे मॅडम तसेच शिक्षक श्री देसाई सर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर लकी ड्रॉ वितरण झाले यामध्ये महिलांना साड्यांचे तसेच भात कापणी वैभव वीळे, घमेली ,फळझाडे यांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी सेविका स्नेहा खोत तसेच प्रगत शेतकरी गटाचे अध्यक्ष श्री मनोज मालवणकर श्री श्यामसुंदर मालवणकर, मंदार मयेकर आणि सदस्यांनी खूप मेहनत घेतली

▪️लोकसहभाग आणि उत्साहाचे वातावरण:

या भात लावणी महोत्सवाला एका सणाचे स्वरूप आले होते. चिखलात उतरून भात लावणी करताना –

शालेय विद्यार्थ्यांना शेतीचे प्रत्यक्ष ज्ञान व संस्कार मिळावेत यासाठी परिसरातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमात भात लावणे हा विषय नव्हता तर जे शेती करत नाहीत त्यांना आपल्या मातीला स्पर्श व्हावा व तिचे ऋण फेडवेत असा संदेश होता. त्याचा आनंद अनुभव अगदी अधिकाऱ्यांपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांनी, शिक्षकांनी, विध्यार्थ्यानी, चाकरमान्यांनी, पर्यटकांनी अनुभवला.

▪️सामूहिक शेतीचा नवा पायंडा-

गेल्या काही वर्षांत मजुरांची टंचाई आणि वाढता खर्च यामुळे शेती करणे आव्हानात्मक बनले आहे. अशा वेळी ‘गट शेती’ आणि ‘श्रमदान’ या संकल्पनेचा वापर करून काळसे येथील शेतकऱ्यांनी शेतीपुढील संकटांवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.पडीक जमीन ओलिताखाली आणून त्यावर एकाच दिवसात भात लावणी करणे हे केवळ सामूहिक प्रयत्नांमुळेच शक्य झाले. शेतीमधील हा नवा उत्साह गावाला समृद्धीकडे घेऊन जाईल यात शंका नसावी.