नकटीच्या लग्नात सतराशे विघ्न…!
वार्तापत्र -कोकण संतोष वायंगणकर.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाच्या कामाच्या दर्जा आणि गुणवत्तेच्या बाबतीत निश्चितच प्रश्न निर्माण होणारे आहेत. ते कुणालाही नाकारता येणारे नाहीत. परंतु किमान सिंधुदुर्गात महामार्ग वाहतुकीला योग्य आहे की नाही हा प्रश्न असला तरी वाहतुकीला खुला करण्यात आला आहे. परंतु त्याचवेळी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मात्र महामार्गाच काम आजही चाचपडत चालू आहे. यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे न्यायप्रविष्ठता, पोट ठेकेदारी अशा अनेक गोष्टींना अडचणी निर्माण झाल्या. महाराष्ट्रातील अनेक रस्ते प्रकल्प काही ठराविक कालावधीत पूर्णही झाले. परंतु कोकणासाठी महत्वपूर्ण असणारा मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्प मात्र वर्षानुवर्षे रखडलेला आहे…
मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले कामाला एक-दोन नव्हेतर तब्बल २२ वर्षे होत आली. कोकणात कोणताही प्रकल्प राबवायचा म्हटला की तो प्रकल्प सहजपणे होत नाही. त्यात अनेकजण अडथळे आणणारे असणारच. यात नवीन असे काहीच नाही. मग तो प्रकल्प कोकणातील जनतेला फायदा होणार असेल किंवा कोकणातील जनतेच नुकसान करणारा असला तरीही पहिल्या दिवसापासून किंवा प्रारंभापासूनच शंका, कुशंका आणि अडवणुक ही आलीच. मुंबई ते गोवा महामार्ग ७० वर्षांपूर्वीच बांधला गेला आहे. त्यामुळे मुंबईहून गोव्याला, कोकणात येण्यासाठी मार्ग होताच. पूर्वी जलमार्गाने कोकणात आणि गोव्यालाही ये-जा व्हायची. परंतु मुंबईहून कोकणातून गोव्याला जाण्यासाठी नव्याने चौपदरीकरणाचा महामार्ग बांधण्यासाठी सुरूवात झाली. परंतु गेली वीसवर्षे कोकणातील या महामार्गाचे काम सुरू झाले. परंतु मुंबईतून सुरू झालेल्या या महामार्गात पहिला अडथळा आला तो रायगड जिल्ह्यामध्येच कारण कोणतीही असोत परंतु त्यासाठीची सोडवणुक करण्यात आली नाही. कधी वनविभागाचा अडथळा, तर कधी भूमिपूत्रांनी अडवलेल अर्थात याला कारण प्रशासनातील गलथानपणा प्रथम कारणीभूत ठरला आहे. बऱ्याच प्रकल्पांच्या बाबतीत जनतेतून होणारा विरोध हा ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांना समाधानकारक उत्तर न देण्याची प्रशासनातील कार्यपद्धती आहे. यामुळे विरोधाची धार अधिक तिष्ण होत रहाते. तोच प्रकार सुरूवातीच्या काळात मुंबई-गोवा महामार्गाच्याबाबतीत घडलेला दिसून येईल. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातून गोवा राज्यात जाणाऱ्या या महामार्गाचे काम एका ठराविक कालमर्यादेत होणं आवश्यक होतं. परंतु रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये महामार्गाचे काम पूर्ण होण्यास फारच विलंब झाला. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील या महामार्गाच्या कामांची अडथळ्यांची शर्यत काही संपता संपेना अशी स्थिती आहे. त्यामानाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महामार्गाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाच्या कामाच्या दर्जा आणि गुणवत्तेच्या बाबतीत निश्चितच प्रश्न निर्माण होणारे आहेत. ते कुणालाही नाकारता येणारे नाहीत. परंतु किमान सिंधुदुर्गात महामार्ग वाहतुकीला योग्य आहे की नाही हा प्रश्न असला तरी वाहतुकीला खुला करण्यात आला आहे. परंतु त्याचवेळी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मात्र महामार्गाच काम आजही चाचपडत चालू आहे. यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे न्यायप्रविष्ठता, पोट ठेकेदारी अशा अनेक गोष्टींना अडचणी निर्माण झाल्या. महाराष्ट्रातील अनेक रस्ते प्रकल्प काही ठराविक कालावधीत पूर्णही झाले. परंतु कोकणासाठी महत्वपूर्ण असणारा मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्प मात्र वर्षानुवर्षे रखडलेला आहे. आतापर्यंत अनेकवेळा तारखा जाहीर झाल्या. परंतु या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी काही मुहर्तच सापडत नाही अशी स्थिती आहे. केंद्रिय रस्ते विकास मंत्री यांनी कोकणातील या मुंबई-गोवा महामार्गाच्या बाबत हतबलता जाहीर भाषणातून व्यक्त केली होती. कोकणातील या मुंबई-गोवा महामार्गाचा विषय आला की केंद्रिय रस्ते विकास मंत्री ना. नितीन गडकरी यांनी अनेकवेळा देशातील अनेक रस्ते विकासाचा उल्लेख त्यांनी केला आहे. परंतु कोकणातील हा महामार्ग रखडण्याला अनेक कारण असल्याचेही त्यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. खा.नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी प्रारंभवर्षा निमित्ताच्या समारंभात ना.नितीन गडकरी यांनी मे अखेरीस मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल असे स्पष्ट केले होते. परंतु अजुनही या महामार्गाचे चिपळूण आणि संगमेश्वर भागात थोड काम उरलय. परंतु खरोखरीच या महामार्गाचे काम बऱ्यापैकी पुर्णत्वाला आले आहे हे नाकारता येणारे नाही. परंतु यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी कोकणातील मुंबईकर याच मुंबई-गोवा महामार्गाने सुखकर निश्चितपणे प्रवास करू शकतील.
एका गोष्टीचा आपण सर्वानीच विचारही करण्याची आवश्यकताही आहे. ती म्हणजे कोणत्याही प्रकल्पाला होणारी काही योग्य कारणांसाठी तर काही केवळ राजकारणासाठीची अडवा-अडवी यामध्ये कधी, कोणत्या प्रकल्पाला किती वेळ लागला हे नीट सांगता येत नसेल तरीही विकासाच्या बाबतीत आपण तितकी वर्षे मागे जातो. याचा विचारही कधीतरी कोकणातील अडवा अडवीचेच मोठं काम करणाऱ्यांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम ज्या संथपणे होत राहीले त्यामुळे या मुंबई-गोवा महामार्गावरील उद्योग, व्यवसाय डबघाईला आला. जितकी वर्षे या महामार्गाचे काम होत राहीले तितकी वर्षे या मार्गावरील हॉटेल आदी व्यवसाय बंद पडण्याच्या स्थितीत गेले. गेल्या दोन वर्षात या महामार्गावरून वाहतुक पुन्हा होऊ लागल्याने या मार्गावर थोडीफार उभारी मिळाली आहे. आता निश्चितपणे जे थोडफार रखडलेले काम आहे ते देखिल पूर्ण होईल. परंतु कोकणात एक प्रचलित म्हण आहे ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’ काहीशी तीच अवस्था कोकणातील या महामार्गाची झाली आहे.













