मानवसेवेचा प्रेरणादायी उपक्रम….
वेंगुर्ले : प्रतिनिधी
करुणा, प्रेम आणि सह-अस्तित्वाच्या भावनेतून समाजसेवेचा संदेश देणाऱ्या संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे स्वातंत्र्यदिनी नेमळे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय, नेमळे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. “या शिबिरात जिल्हा रुग्णालय रक्तपेढी, सिंधुदुर्गच्या सहकार्याने ३४ युनिट रक्त संकलित करण्यात आले.”
यासोबतच आरोग्यम फिटनेस सेंटर व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीरही राबविण्यात आले. त्यामध्ये अत्याधुनिक मशीनद्वारे शारीरिक तपासणी करून प्रत्येक व्यक्तीस सविस्तर अहवाल दिला गेला. तसेच संतुलित आहार, नियमित व्यायाम व निरोगी जीवनशैली याबाबदत मार्गदर्शन करण्यात आले.
“सिंधुदुर्ग, जिल्हा रुग्णालय रक्त संक्रमन अधिकारी डॉक्टर उन्नती लडकत व श्री.पवन हराळे सर बोलताना म्हणाले विधात्याने ही सृष्टी निर्माण करताना प्रत्येक गोष्टीला एक पर्यायी व्यवस्था केली आहे, मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक क्रांती घडवून आणली पण अजून अस कोणतंच तंत्रज्ञान मानवाला अवगत झालं नाही की जे रक्त तयार करू शकेल. मानवाला मानवाशी जोडून ठेवण्यासाठी रक्तदाना सारखं महान समाजिक कार्य करत आहात त्यासाठी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे खूप कौतुक केले.” यावेळी निरंकारी भक्त, स्थानिक सज्जन तसेच संत निरंकारी मंडळाचे सेक्टर संयोजक, मुखी प्रबंधक व सेवादल अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण शिबिरात स्वच्छता, सुरक्षितता, नियोजन आणि सेवाभावाला विशेष प्राधान्य देण्यात आले.
संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून रक्तदानाची महान सेवेची परंपरा गेल्या चार दशकांहून अधिक काळ अखंड सुरू असून, देशभरात आयोजित रक्तदान शिबिरांतून आतापर्यंत १५ लाखांहून अधिक युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे. मानवसेवेसाठी मिशनची असलेली अटळ बांधिलकी या कार्यातून अधोरेखित होते. कार्यक्रमाच्या शेवटी ब्रम्हज्ञान प्रचारक श्री. विजय मडगांवकर यांनी उपस्थित मान्यवर, रक्तदाते, स्वयंसेवक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्यम फिटनेस सेंटर तसेच आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.












