वेंगुर्ले येथील रोटरियन राजेश घाटवळ “राष्ट्रीय रोटरी चॅम्पियन” पुरस्काराने सन्मानित..

वेंगुर्ले : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे रोटरियन तसेच डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ यांना त्यांच्या उल्लेखनीय रोटरी सेवा, उत्कृष्ट नेतृत्व आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ‘”राष्ट्रीय रोटरी चॅम्पियन” या मानाच्या पुरस्काराने रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंट ओलाइंका बाबालोला, रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर के.पी.नागेश , रोटरी टिआएफ ट्रस्टी ए.एस. वेंकटेश यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.डॉक्टर लेनी डिकाॅस्टा, माजी प्रांतपाल अरुण भंडारे, नासीर बोरसादवाला, गौरीश धोंड, डॉ.विनय पै रायकर, शरद पै, संग्राम पाटील, राजुभाई दोशी, भावी प्रांतपाल विक्रांत कदम, अशोक नाईक, डॉ.सुहास जोशी, वासुकी सानजी आदी मान्यवर उपस्थित होते.

रोटरीच्या माध्यमातून समाजसेवा, नेतृत्वगुण आणि पोलिओ निर्मुलन व. रोटरीच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय सहभाग घेत त्यांनी रोटरीच्या कार्याला प्रभावीपणे पुढे नेले आहे. त्यांच्या समर्पित सेवाभावाची, नेतृत्वाची आणि रोटरीप्रती असलेल्या बांधिलकीची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

या पुरस्कारामुळे रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. राजेश घाटवळ यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रोटरी वेंगुर्ला मिडटाऊन क्लबचे प्रेसिडेंट ॲड. प्रथमेश नाईक व सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच रोटरी मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.