तालुक्यात तिसरी कारवाई ; अवैध ६२ हजार ९८० रुपये किंमतिचा खतसाठा जप्त
वेंगुर्ले : दाजी नाईक
तालुक्यातील परुळे येथे विनापरवाना विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेल्या सेंद्रिय व रासायनिक खतांचा साठा कृषी विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये जप्त केला. या कारवाईत एकूण ६२ हजार ९८० रुपये किमतीचा खतसाठा ताब्यात घेण्यात आला असून, याप्रकरणी परुळे बाजारवाडी येथील अजित चंद्रकांत शिरसाट (वय ६५) यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. बेकायदेशीर खत विक्री वरील या हंगामातील ही तिसरी कारवाई आहे. याप्रकरणी प्रकाश बाळासो मोहिते (कृषी अधिकारी गुण निंयत्रण) तालुका कृषी अधिकारी कार्यालय, वेंगुर्ला यांनी निवती पोलीस स्थानकात तक्रार दिली. त्यामध्ये असे म्हटले आहे की, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयात अनिल धोंडू परब ( रा. परुळे, गवाण )यांनी अजीत चंद्रकांत शिरसाट (रा. परुळे, ता. वैगुर्ला) हे बेकायदेशिरपणे खत विक्री, चढ्यादराने खत विक्री, भेसळयुक्त खत विक्री व खतांची साठेबाजी करुन खतांची कृत्रिम टंचाई र्निमाण करीत आहेत, अशी तक्रार दिली होती. या अर्जाच्या अनुषंगाने मंगळवारी प्रकाश मोहिते यांनी परुळे येथे ही कारवाई केली.
अजित चंद्रकांत शिरसाट यांच्या कडे पंचासमक्ष एका खोलीत तपासणी केली असता खोलीमध्ये खतसाठा आढळून आला. त्याबाबत अजित चंद्रकांत शिरसाट यांच्याकडे सदर खतसाठा व विक्रीबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगीतले की, खतांचा साठा विक्रीच्या उद्देशाने आणला असून आपण त्याची विक्री करीत असल्याचे पंचासमक्ष कबुल केले. तसेच साठवणूक व विक्री संबधी परवाना घेतला आहे काय? असे विचारले असता त्यांनी कोणताही वैध परवाना आपल्याकडे नसल्याचे पंचासमक्ष सांगीतले. यावेळी खोलीत ६२,९८० रु. किंमतिचा मुद्देमाल खतसाठा आढळून आला आहे. हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरु आहे.
यावेळी परुळे सहाय्यक कृषी अधिकारी सूरज परब,
परुळे सरपंच प्रणिती आंबडपालकर,
चिपी -परुळे पोलीसपाटील संदेश पवार, कर्ली पोलीसपाटील जान्हवी खडपकर, गवाण पोलीस पाटील श्वेता चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी ३३,६०० रु. किंमतीच्या १८:१८:१० या ग्रेडच्या रासायनिक खतांच्या बसंत अग्रोटेक लिमीटेड या कंपनीच्या ५९ किलो वजनाच्या २१ गोण्या, १२०० रु. किंमतीचे सिंगल सुपर फॉस्फेट पावडर प्लास्टीकच्या निळ्या ड्रममध्ये भरून ठेवलेली एकूण वजन अंदाजे १०० किलो, ५४०० रु. किंमतीचे सेंद्रिय व इतर मिश्र रासायनीक खतांचे मिश्रण असलेले प्लास्टीक निळ्या ड्रममध्ये भरून ठेवलेले एकूण वजन अंदाजे ४५० किलो, १२००० रु. किंमतीचे रासायनिक खत प्लास्टीकच्या निळ्या ड्रममध्ये भरून ठेवलेले एकूण वजन अंदाजे ४०० किलो, १२०० रु. किंमतीचे युरीया खत प्लास्टीकच्या निळ्या ड्रममध्ये भरून ठेवलेले एकूण वजन अंदाजे १५० किलो, ८२५० रु. किंमतीचे १५:१५:१५ या ग्रेडच्या रासायनिक खतांच्या आर. सी. एफ कंपनीच्या ५० किलो वजनाच्या ५ गोण्या,
६३० रु. किंमतीचे सिंगल सुपर फॉस्फेट पावडर श्री पुष्कर केमीकल्स अॅन्ड फर्टीलायझर लिमीटेड या कंपनीची ५० किलो वजनाची १ गोणी, ७०० रु. किंमतीचे मायसीग्रीन असे लेबल असलेली त्यावर निंबोळी पेंडयुक्त नैसर्गिक सेंद्रिय खत असे लिहीलेले हिंदुस्थान अँग्रो केमिकल्स अॅन्ड फर्टीलायझर लिमीटेड या कंपनीची ५० किलो वजनाची १ गोणी असे एकूण ६२ हजार ९८० रुपये एकूण किंमतीचा मुद्देमाल खतसाठा आढळून आला आहे. त्याची मोजदाद करुन जप्त करण्यात आला आहे. काल परुळे बाजारवाडी येथे अजित चंद्रकांत शिरसाट हे सेंद्रीय व रायायनिक खतांचा साठा विनापरवाना विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या स्थितीत आढळून आल्याने निवती पोलीस स्थानकात प्रकाश मोहिते यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार या प्रकरणी अजित शिरसाट यांच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३(२)(अ), ३(२)(ड), ३(२)(ई), ७(१)(अ)(ii) तसेच खत नियंत्रण आदेश १९८५ मधील खंड ३(३), ७, ८, १२, १९(अ), १९(ब), १९(क)(i) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास निवती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय सायमन डिसोजा करीत आहेत.













