सावंतवाडी:
मानवी आरोग्यास घातक आणि राज्यात विक्रीस बंदी असलेला ९६ हजार १०२ रुपये किंमतीचा गुटखा साठवून ठेवल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने गवत मार्केट परिसरात धडक कारवाई केली आहे. या कारवाईत अमिन अब्दुलगणी शाह (रा. बुरान गल्ली, बाहेरचा वाडा, सावंतवाडी) याला पोलिसांनी अटक करून त्याचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सावंतवाडी येथील पेट्रोल पंपाच्या बाजूस असलेल्या गवत मार्केटमधील एका पानपट्टी स्टॉल समोर बेकायदेशीर गुटखा साठवून ठेवण्यात आला होता. या बातमीच्या आधारे १९ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी अचानक छापा टाकला. या छाप्यात अमिन शाह याच्या ताब्यातून आरोग्यास अपायकारक असलेला प्रतिबंधित गुटखा साठा पोलिसांनी हस्तगत केला.
आरोग्यास घातक आणि असुरक्षित असलेला गुटखा विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संजय कोरगावकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी अमिन शाह याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या विविध कलमांसह भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २७४ व २७५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या घटनेचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक टीमला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. तसेच पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, साहाय्यक पोलीस निरीक्षक खंदरकर आणि पोलीस हवालदार जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक खंदरकर करत आहेत.













