चाकरमान्यांच्या अडचणी कायम!
चिपळूण (वार्ताहर) : तब्बल नऊ वर्षांपूर्वी २०१७-१८ मध्ये सुरू झालेल्या चिपळूणच्या बहुचर्चित हायटेक बसस्थानकाचे काम अद्याप केवळ ५० टक्केच पूर्ण झाले असून, कासवगतीने सुरू असलेल्या या कामामुळे यंदाच्या गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पावसाळ्याचे दिवस आणि अपूर्ण कामामुळे प्रवाशांना स्थानकात मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. दोन महिन्यांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चिपळूण बसस्थानकाच्या कामाची पाहाणी करून कामाला वेग देण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, मंत्र्यांच्या पाहणीनंतरही कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही. या आदेशाची अंमलबजावणी नेमकी कितपत झाली, हाच प्रश्न आहे. परिवहन मंत्र्यांच्या पाहाणीनंतर कामाला वेग येईल आणि गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, कामाची सद्यस्थिती पाहता ही अपेक्षा पूर्ण होणार का, असा प्रश्न आहे. उर्वरित कामाची निविदा कधी निघणार, प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार आणि संपूर्ण बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत कधी दाखल होणार, याकडे आता चिपळूणकरांचे लक्ष लागले आहे.
गणेशोत्सावाच्या काळात चिपळूणमध्ये येणाऱ्या चाकरमान्यांसाठी पावसापासून संरक्षण, बसची प्रतीक्षा करण्यासाठी पुरेशी जागा आणि इतर मूलभूत सुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मात्र, स्थानकाचे काम अपूर्ण राहिल्यास पावसातच बसची प्रतीक्षा करण्याची वेळ प्रवाशांवर येणार आहे. गेली काही वर्षे हे चाकरमानी बसस्थानक अपूर्ण असल्याचा त्रास सहन करीत आहेत. यंदाही त्यांना त्याच समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. या हायटेक बसस्थानकाच्या पहिल्या मजल्यावरील कार्यालय उभारणीसह काही महत्त्वाची कामे अद्याप बाकी आहेत. किमान गणेशोत्सवापूर्वी प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रशासनाने ठोस नियोजन करावे, अशी मागणी प्रवासी आणि चाकरमान्यांकडून होत आहे.













