सीसीटीव्हीत चोरटे कैद; पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी
खेड:
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. शहरात सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खेड पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या दुकानात महिलांकडून चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच, आता खेड रेल्वे स्थानकासमोरील एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पहाटेच्या सुमारास चोरटे पार्किंगमध्ये शिरले आणि गाड्यांमधील वस्तू व साहित्य चोरी करताना सीसीटीव्हीत दिसून आले. विशेष म्हणजे रेल्वे स्थानक परिसरात २४ तास मोठी वर्दळ असते. मात्र, रात्री आणि पहाटेच्या वेळी पोलिसांची गस्त अपुरी असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
यापूर्वीही रेल्वे स्थानक परिसरात चोरीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
खेड शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलिसांनी रात्री आणि पहाटेच्या वेळी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन खेड शहरातील चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कोणती ठोस पावले उचलणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.












