सहकार सचिव संतोषकुमार पाटील यांची शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयास सदिच्छा भेट

 विद्यार्थ्यांना सहकार व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन
चिपळूण (प्रतिनिधी) : शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे सहकार सचिव संतोषकुमार पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी रत्नागिरीचे सह निबंधक राम कुलकर्णी यांचीही उपस्थिती होती.
महाविद्यालयात आगमन झाल्यानंतर सहकार सचिव संतोषकुमार पाटील व सहनिबंधक राम कुलकर्णी यांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अनिरुद्ध निकम यांनी सर्व मान्यवरांना महाविद्यालयामधील विविध उपक्रमांची सखोल माहीती दिली. यावेळी डॉ. निखिल चोरगे उपस्थित होते. संतोषकुमार पाटील हे स्वतः कृषि पदवीधर असून कृषि क्षेत्राची तसेच सहकार क्षेत्राची त्यांना सखोल माहिती आहे. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहकार विभागाची कार्यप्रणाली, सहकार क्षेत्रातील विविध संधी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी या विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सहकार विभागाची रचना, विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रम, सहकार क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि कृषि पदवीधरांसाठी उपलब्ध असलेल्या विविध करिअरच्या संधी याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी अभ्यासाचे नियोजन, सातत्य, चालू घडामोडींचा अभ्यास, विषयाची मूलभूत संकल्पना स्पष्ट असणे आणि योग्य दिशेने केलेली तयारी यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. कृषि शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक रोजगाराच्या संधींकडे न पाहता सहकार, प्रशासन, बँकिंग, शासकीय सेवा तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून व्यापक करिअरच्या संधींचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या अनुभवाधारित आणि प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना सहकार विभाग व स्पर्धा परीक्षांविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना कृषि शिक्षणासोबतच शासकीय सेवा आणि सहकार क्षेत्रातील करिअरच्या विविध वाटा समजून घेण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हरिश्चंद्र भागडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.