संस्थानचे राजे खेमसावंत व पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत नारळी पौर्णिमा साजरी
सावंतवाडी । प्रतिनिधी :
नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे येथील संस्थानकालीन ऐतिहासिक मोती तलावात सावंतवाडीकरांच्या वतीने मोठ्या उत्साहात नारळ अर्पण करण्यात आला. सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या प्रमुख उपस्थितीत मानाच्या सुवर्ण नारळाचे विधीवत पूजन करून तो मोती तलावाच्या जलात अर्पण करण्यात आला.
परंपरेनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यातून या मानाच्या सुवर्ण नारळाची ढोल-ताशांच्या गजरात आणि वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक मोती तलाव परिसरात पोहोचल्यानंतर राजेसाहेब खेमसावंत भोसले व पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते नारळाचे धार्मिक विधीनुसार पूजन करण्यात आले. पूजनाचा कार्यक्रम पार पडताच हा मानाचा सोन्याचा नारळ तलावात अर्पण करण्यात आला. यानंतर तलावाकाठी उपस्थित असलेल्या स्थानिक युवकांनी पाण्यात उड्या मारून नारळ मिळवण्यासाठी एकच जल्लोष केला.
दरम्यान, दरवर्षीच्या तुलनेत यंदा या सोहळ्यासाठी मोती तलाव परिसरात नागरिकांची गर्दी लक्षणीयरीत्या कमी दिसून आली. या पारंपरिक सोहळ्यास सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, युवराज लखमराजे भोसले, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, नगरपरिषद सभापती आनंद नेवगी, सुधीर आडीवरेकर, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, दिलीप भालेकर, काका मांजरेकर, कृष्णा राऊळ, श्री. गवस, पोलीस श्री. धोत्रे, आबा पिळणकर आणि श्री. लोंढे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.














