लवकरच गावागावात सहकार बाजार उभारणार
वैभववाडी येथे जिल्हा बँक च्या वतीने २२ विकास संस्थांचा सत्कार सोहळा संपन्न
वैभववाडी प्रतिनिधी :
सहकार संस्थांचा कारभार अधिक गतिमान आणि पारदर्शक होण्यासाठी सभासद व सचिव यांच्यात सातत्याने संवाद असणे आवश्यक आहे. सहकार संस्थानी कामाची व्याप्ती वाढवली पाहिजे. सभासदांनी संस्थेच्या कार्यालयात नियमित यावे, यासाठी त्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सिंधुदुर्ग जिल्हा बँक सदैव सहकार संस्थांच्या पाठीशी आहे. लवकरच सहकार संस्थांच्या माध्यमातून गावागावात ‘सहकार बाजार’ उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक मनीष दळवी यांनी केले.
वैभववाडी पंचायत समितीच्या सभागृहात शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने ३० जूनअखेर वसुलपात्र बँक कर्जाची १०० टक्के वसुली करणाऱ्या विकास संस्थांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित मेळाव्यात श्री. दळवी बोलत होते.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक गजानन गावडे, संचालक रविंद्र मडगांवकर, संचालक दिलीप रावराणे, बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील, नानिवडे विकास संस्थेच्या चेअरमन सीमा नानिवडेकर, पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे, एडगाव विकास संस्थेचे चेअरमन सुनील रावराणे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, क्षेत्रवसुली सरव्यवस्थापक दत्ताराम गावडे, संगणक प्रमुख हडकर, तालुका विकास अधिकारी प्रल्हाद कुडतरकर, वैभववाडी शाखा व्यवस्थापक सुरेश रावराणे यांच्यासह विविध विकास संस्थांचे चेअरमन, सचिव व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनीष दळवी म्हणाले की, गावातील सहकार संस्थांमध्ये पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने संस्थांचे आर्थिक व्यवहार संगणकीकृत करण्यात आले आहेत. संस्थांच्या सर्व नोंदी संगणकावर उपलब्ध असल्याने आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक सुसूत्रता आली आहे. जिल्ह्यात नव्याने ७२ सचिवांची नियुक्ती करण्यात आली असून, कॅडरच्या माध्यमातून प्रत्येक सचिवाला सुमारे २० ते २५ हजार रुपये वेतन दिले जात आहे.
कमी व्यवहार असलेल्या संस्थांनी आपल्या व्यवहारात वाढ केली पाहिजे. प्रत्येक संस्थेला दोन कोटी रुपयांच्या व्यवहाराचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून उपलब्ध होणारी सर्व प्रकारची कर्जे विकास संस्थांमार्फत देण्याची सुविधा लवकरच सुरू करण्यात येईल. कर्जदारांना कमीत कमी सात दिवसांत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाच लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी थेट अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले असून, त्यासाठी संचालकांची वाट पाहण्याची आवश्यकता राहणार नाही.
यापुढे कर्जदाराकडून दहा टक्क्यांऐवजी पाच टक्के शेअर्सची कपात करण्यात येणार आहे. मार्चअखेर वैभववाडी तालुक्याने चांगली कर्जवसुली केली आहे. प्रत्येक कर्जदाराला नियमित कर्जफेडीची सवय लागली पाहिजे. नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदारांचाही संस्थांनी सत्कार केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
वैभववाडी तालुक्यात मुबलक पाणीसाठा असल्याने दुग्ध व्यवसायाला मोठी संधी आहे. तालुक्यातील दहा विकास संस्थांमध्ये लवकरच सहकार बाजार सुरू करण्यात येणार आहेत. ज्या संस्थांना गोडाऊन उभारण्यासाठी कर्जाची आवश्यकता आहे, त्यांना तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. संचालक दिलीप रावराणे यांनी तालुक्यातील सहकार क्षेत्रात चांगले काम केले आहे. प्रत्येक संस्थेने आपल्या सभासदांशी सातत्याने संपर्क व संवाद ठेवावा. शेतकऱ्यांना उत्तम सेवा देण्यासाठी जिल्हा बँक तुमच्या सोबत आहे. पाच वर्षांत जिल्हा बँकेचा कारभार दुप्पट होत असेल, तर सहकार संस्थांनीही आपल्या कामाची व्याप्ती वाढवली पाहिजे, असे आवाहन दळवी यांनी केले.
यावेळी संचालक गजानन गावडे यांनी नियमित कर्जफेडीचे फायदे भविष्यात निश्चित मिळतात, असे सांगितले. संस्थांनी बँकेप्रमाणे सक्षमपणे काम केले पाहिजे. संस्था सक्षम झाल्यास शेतकरीही सक्षम होईल. ज्या संस्थांचा व्यवसाय कमी आहे, त्यांनी भविष्यातील ‘व्हिजन’ निश्चित करून त्यानुसार कामाला लागावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी संचालक दिलीप रावराणे, दिगंबर पाटील, सीमा नानिवडेकर आणि अनिरुद्ध देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार संचालक दिलीप रावराणे यांनी मानले.
२२ विकास संस्थांचा सत्कार
३० जूनअखेर वसुलपात्र बँक कर्जाची १०० टक्के वसुली केल्याबद्दल दिर्बादेवी विकास संस्था तिथवली, केदारलिंग विकास संस्था करूळ, अचिर्णे विकास संस्था, देवी आदिष्टी विकास संस्था खांबाळे, केदारलिंग विकास संस्था हेत, गांगेश्वर विकास संस्था भुईबावडा, श्री महालक्ष्मी विकास संस्था कोकिसरे, शिवाजी विकास संस्था तिरवडे, शंकर प्रासादिक विकास संस्था नाधवडे, ग्रामसेवा विकास संस्था सोनाळी, श्री राम विकास संस्था नावळे, श्री कुंभजाई विकास संस्था कुंभवडे, श्री सिद्ध गांगेश्वर विकास संस्था उपळे, श्री गांगेश्वर विकास संस्था गडमठ, रवळनाथ विकास संस्था एडगाव, श्री छत्रपती शिवाजी विकास संस्था अरुळे, ओम विकास संस्था आखवणे, श्री देव ठाणेश्वर विकास संस्था नापणे, श्री देव गांगो विकास संस्था लोरे, श्री एकविरा विकास संस्था नानिवडे, श्री प्रकाश विकास संस्था कुर्ली आणि श्री रवळनाथ विकास संस्था सडूरे या २२ विकास संस्थांचा यावेळी सत्कार करण्यात आला.













