रत्नमाला माईन (सौ. सानिका भितळे) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

एक शालीन व्यक्तिमत्व हरपल्याची व्यक्त होतेय भावना

देवरूख (प्रतिनिधी)

संगमेश्वर तालुक्यातील निवेखुर्द माईनवाडीतील रत्नमाला रामचंद्र माईन (सौ. सानिका संदीप भितळे वय-३६) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या अकाली निधनाने निवेखुर्द व तळवडे गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. एक शालीन व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. लांजा तालुक्यातील तळवडे येथील संदीप भितळे यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना साडेतीन वर्षाचा लहान मुलगा आहे. विशेष म्हणजे संदीप भितळे हे भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत.

रत्नमाला माईन (सौ. सानिका भितळे) या देवरूख येथील सर्व शिक्षा अभियान कार्यालयात अपंग समावेशीत शिक्षण प्रतिनिधी म्हणून कार्यरत होत्या. शांत, प्रेमळ, हसतमुख, कर्तव्यदक्ष आणि सर्वांच्या सुख-दुःखात धावून जाणाऱ्या रत्नमाला माईन (सौ. सानिका भितळे) यांनी आपली शासकीय सेवा कायम झाल्यानंतरही देवरूख केंद्रात अपंग समावेशीत शिक्षणात शासनाची प्रतिनिधी म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे त्या आपली सेवा बजावत होत्या. एक आदर्श कर्मचारी म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. कोणतेही शिक्षक प्रशिक्षण कुठेही असले तरी त्या नियोजन व व्यवस्थापनात नेहमी सक्रीय असायच्या. त्यामुळे देवरूख शिक्षण विभागात त्या चांगल्या परिचीत होत्या. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळे होते. त्या आपल्यातून अचानक निघून गेल्या आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. कार्यालयातील सर्व सहकारी कर्मचारीही शोकमग्न झाले आहेत. त्यांच्या जाण्याने माईन आणि भितळे कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.