सावंतवाडी:
सावंतवाडी तालुक्यातील माजगाव उद्यम नगर येथील ‘पायोनियर फूड्स’ कंपनीजवळ एका १८ वर्षीय तरुणाने झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जॉन जोरसेफ टोपो (वय १८, रा. झारखंड) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत जॉन टोपो हा माजगाव उद्यम नगर येथील पायोनियर फूड्स कंपनीत कामाला होता. दिनांक ३० ऑगस्ट रात्री ११:०० ते दि. ३१ ऑगस्ट सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास त्याने कंपनीत असलेली नायलॉनची दोरी कापून घेतली. त्यानंतर कंपनीपासून सुमारे १०० मीटर अंतरावर असलेल्या एका जंगली झाडाला त्या दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला.
या घटनेची माहिती त्याचा सहकारी लालबीर राम दयाल खडिया (वय २२, रा. झारखंड, सध्या रा. माजगाव) याने सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शेलार, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, महिला पोलीस उपनिरीक्षक मुळीक आणि पोलीस नाईक कोरगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करत असून, दाखल अंमलदार म्हणून पोलीस हवालदार वालावलकर काम पाहत आहेत. तरुण आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.












