देवरूख प्रतिनिधी):
देवरूखमधील श्री गणेश वेद पाठशाळा आणि श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. २ सप्टेंबर, २०२६ रोजी सायं. ५:३० वाजता सुप्रसिद्ध प्राच्यविद्या संशोधक व भारत विद्या अभ्यासक इंद्रनील बंकापुरे यांचे ‘मंदिरांच्या देशा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानाचे आयोजन श्री गणेश वेद पाठशाळा देवरुख, द्विभुज गणेश मंदिर येथील कात्रे-चांदोरकर सभागृहात करण्यात आले आहे.
भारतीय मंदिरांचे रचना शास्त्र, त्यामागील विज्ञान व अध्यात्म, मंदिर स्थापत्याची वैशिष्ट्ये अशा अनेक गोष्टीचा उलगडा या कार्यक्रमातून होणार आहे. भारतीय मंदिर परंपरेमागील ज्ञान, विचारसरणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेण्याची संधी या कार्यक्रमातून नागरिकांना मिळणार आहे. तरी या व्याख्यानाचा लाभ इतिहास अभ्यासक व संशोधक आणि मंदिर प्रेमी नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन श्री गणेश वेद पाठशाळा कार्यकारी मंडळ आणि श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.













