आंबवली प्रभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य मिरवणुकीसह उत्साहात सत्कार

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील आंबवली प्रभागातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी भव्य मिरवणूक व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. इयत्ता चौथी, पाचवी, सातवी व आठवी शिष्यवृत्तीधारक तसेच पात्र विद्यार्थी आणि स्काऊट-गाईड बुलबुल सुवर्णबाण राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनींचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या भव्य मिरवणुकीची सुरुवात वरवली केंद्रशाळेपासून करण्यात आली. सुकिवली गटाचे जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पहार घालून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि विद्यार्थ्यांच्या जयघोषामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ही मिरवणूक आंबवली बीट शाळेपर्यंत नेण्यात आली.
आंबवली बीट शाळेत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, आंबवली येथील अकरावी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी दिंडीच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थिनींचे औक्षण करून पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून सत्कार सोहळ्याला सुरुवात झाली.
यावेळी चौथी, पाचवी, सातवी व आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, पात्र विद्यार्थी तसेच स्काऊट-गाईड बुलबुल सुवर्णबाण राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनींचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत सहावा क्रमांक मिळविणाऱ्या कु. चिन्मयी श्रीकृष्ण खांडेकर हिचा सुकिवली गटाचे जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सातत्याने परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांचाही यावेळी सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य तसेच शाळेतील पोषक शैक्षणिक वातावरण यांचा मोठा वाटा असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतात नमूद केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे त्यांच्या मेहनतीसोबतच शिक्षक आणि पालकांच्या प्रयत्नांचेही फलित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाला सुकिवली गटाचे जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, तिसंगी गणाचे पंचायत समिती सदस्य महेंद्र भोसले, खेड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी गायत्री माने, न्यू इंग्लिश स्कूल आंबवलीचे चेअरमन विश्वास कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य दर्शनाताई मोरे, पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी संतोष भोसले, शिक्षण विस्तार अधिकारी संदीप कंदुरकर, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या प्रियंका चंद्रशेखर यादव, आंबवलीचे उपसरपंच विजय केशव यादव, वरवलीच्या सरपंच प्राजक्ता दीपक यादव, आंबवली शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साक्षी सतीश यादव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष लक्ष्मण गोगावले यांच्यासह शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
वरवली केंद्रातील विविध शाळांच्या व्यवस्थापन समिती सदस्यांसह सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, आजी-माजी शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंबवली बीटमधील केंद्रप्रमुख विनायक नलावडे, संतोष सपकाळ, दीपक सोनवणे तसेच बीटमधील सर्व शिक्षकवृंद आणि आजी-माजी विद्यार्थ्यांचीही मोठी उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी आंबवली बीट शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण खांडेकर, उपशिक्षिका रसिका रेवाळे (खांडेकर) तसेच सर्व शिक्षकवृंदाने विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक समितीचे कार्यकर्ते शरद भोसले यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्रीकृष्ण खांडेकर यांनी केले.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा सार्वजनिक पातळीवर गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम आंबवली प्रभागातील शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन मिळाल्याने भविष्यातही विविध शैक्षणिक व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये आंबवली प्रभागातील विद्यार्थी उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.