रत्नागिरी : प्रतिनिधी
तालुक्यातील पाली येथील बंद घर फोडून अज्ञाताने टिव्ही, तांब्याचे पातेले, लोटे व मुर्त्या आणि एक टेप रेकॉर्डर असा एकूण 17 हजारांचा मुद्देमाल लांबवला. घरफोडीची ही घटना रविवार 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.30 ते सोमवार 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वा.सुमारास घडली.
शांताराम विश्राम मांडवकर (60,रा.पाली,माईनवाडी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, बंगल्याचे मालक सुरेंद्र सखाराम सावंत हे कुटुंबासह बाहेरगावी गेलेले असताना अज्ञाताने बंगल्याच्या सर्व दरवाज्यांना कुलुपे असतानाही बंगल्याच्या समोरील खिडकीला असलेले लोखंडी ग्रिल काढून आत प्रवेश केला. त्यानंतर 15 हजारांचा सॅमसंग कंपनीचा 55 इंच टिव्ही, 500 रुपयांचे तांब्याचे 3 ते 4 किलो वजनाचे पातेले, 1500 रुपयांचा तांब्याचा लोटा, मुर्त्या व जुना टेप रेकॉर्डर असा एकूण 17 हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.













