“मोकाट जनावरांमुळे अपघात टाळण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषद ॲक्शन मोडमध्ये”

रिफ्लेक्टिव्ह बेल्टसह जनावरांना पकडण्याची विशेष मोहीम

वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले शहरातील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट जनावरांचा वाढता वावर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला नगरपरिषदेने मोकाट जनावरांविरोधात विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेंतर्गत रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या मोकाट जनावरांना पकडून नगरपरिषदेमार्फत गोशाळेत हलविण्यात येणार आहे.सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या जनावरांच्या मालकीबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता ती ताब्यात घेण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, रात्रीच्या वेळी मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी नगरपरिषदेकडून भटक्या गायी, वासरे आणि बैलांना रिफ्लेक्टिव्ह बेल्ट (परावर्तित पट्टे) घालण्यात येत आहेत. वाहनांच्या दिव्यांचा प्रकाश या पट्ट्यांवर पडल्यास अंधारातही जनावरे वाहनचालकांना स्पष्ट दिसणार असून, संभाव्य अपघात टाळण्यास यामुळे मदत होणार आहे.
जनावरांच्या मालकांनी आपली जनावरे मोकाट न सोडता योग्य काळजी घेऊन सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावीत, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे. मोकाट जनावरांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यास संबंधित मालकांवर महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ तसेच वेंगुर्ला नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन व साफसफाई (नियोजन) उपविधी २०१५ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

वेंगुर्ला शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेच्या या मोहिमेस सहकार्य करावे तसेच आपल्या मालकीची जनावरे मोकाट सोडू नयेत, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेने केले आहे.