मुथूट फिनकॉर्पच्या तिघा कर्मचाऱ्यांसह चौघांवर गुन्हा दाखल
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर व ग्रामीण भागातील काही नागरिकांचे सोने तारण ठेवून स्कीममध्ये पैसे गुंतवणूक करून फसवणूक केल्याच्या प्रकरणात अखेर मालवण पोलिसांनी मुथूट फिनकॉर्पच्या मालवण शाखेतील मॅनेजर स्नेहा जामसंडेकर, कर्मचारी तन्मय पराडकर, स्नेहल आचरेकर तसेच एजंट हर्षदा आडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कोळंब सरपंच सिया रामचंद्र धुरी यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलमांन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तब्बल ६ कोटी ९ लाख ६१ हजार ५५५ रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या आदेशाने या प्रकरणाचा तपास जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम व पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून तपास सुरू आहे.
तक्रारीनुसार, जून २०२५ ते मे २०२६ या कालावधीत फसव्या स्कीमद्वारे नागरिकांकडून सोने तारण ठेवून रक्कम जमा करण्यात आली. सुमारे 120 लोकांकडून सोन्याचे दागिने घेऊन त्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘सोने तारण फसवणूक तक्रार निवारण मंच’ सामाजिक स्तरावर स्थापन करण्यात आला आहे.













