BREAKING NEWS: रत्नागिरीत बंद बंगला फोडून तब्बल पावणेनऊ लाखांचा ऐवज लंपास

सोन्या-चांदीसह अमेरिकन डॉलर्सवर चोरांचा डल्ला!  

रत्नागिरी:

शहरालगतच्या एमआयडीसी मिरजोळे येथील एक्झिक्युटिव्ह रेल्वे कॉलनीमध्ये एका बंद बंगल्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ८ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरमालक वैयक्तिक कामासाठी बाहेरगावी गेलेल्या असताना ही धाडसी चोरी झाली असून, या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

फिर्यादी सौ. शालिनी शंकर गंजे (वय ५०, रा. बहार बंगला क्र. ५, एक्झिक्युटिव्ह रेल्वे कॉलनी, एमआयडीसी मिरजोळे) या ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घर बंद करून जळगाव येथे गेल्या होत्या. २ सप्टेंबर रोजी दुपारी त्या रेल्वेने परत येत असताना, घराची साफसफाई करण्यासाठी आलेल्या कामवालीने दरवाजाचे कुलूप तुटलेले असल्याचे शेजाऱ्यांना सांगितले. शेजाऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती सौ. गंजे यांना दिली. सायंकाळी घरी पोहोचल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा तोडून कपाटातील दागिने, रोख रक्कम व परकीय चलन चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.  

चोरीस गेलेला मुद्देमाल (एकूण किंमत: ₹८,७३,०००/-):  

 सोन्याचे दागिने:

 ४० ग्रॅमच्या पाटल्या (२ नग) – ₹१,८०,०००/-  

 ४० ग्रॅमच्या बांगड्या (४ नग) – ₹१,८०,०००/-  

 ३० ग्रॅमच्या पाटल्या (२ नग) – ₹१,३५,०००/-  

 २० ग्रॅमचा राणीहार (१ नग) – ₹९०,०००/-  

 डायमंड व सोन्याचे मंगळसूत्र – ₹७०,०००/-  

 डायमंड व सोन्याचे कानातील टॉप – ₹२२,०००/-  

 १० ग्रॅमचा लक्ष्मीहार – ₹४५,०००/-  

 १० ग्रॅमच्या वळ/रिंग (२ नग) – ₹४५,०००/-  

 कानातील डुल (२ नग) – ₹१३,५००/-  

 हातातील ब्रेसलेट – ₹१३,५००/-  

 अंगठी – ₹९,०००/-  

 रोख रक्कम व परकीय चलन:

 ५०० रुपयांच्या १४० नोटा (एकूण रोख ₹७०,०००/-)  

 ५४० अमेरिकन डॉलर्स  

या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गु.र.नं. १९३/२०२६, भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) (भा.द.वि. कलम ३८०, ४५४, ४५७) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.