ज्ञानदीप बालभवनमध्ये बालगोपाळांची दहीहंडी उत्साहात

खेड (प्रतिनिधी) : भारतीय संस्कृती आणि सण-उत्सवांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, या उद्देशाने मोरवंडे-बोरज येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) संचालित ज्ञानदीप बालभवन (सीबीएसई) येथे बालगोपाळांचा दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी प्रशालेतील चिमुकले विद्यार्थी राधा-कृष्णाच्या आकर्षक वेशभूषेत सहभागी झाले होते. ‘गोविंदा आला रे आला’, ‘कृष्ण जन्मला’ यांसारख्या गाण्यांवर विद्यार्थ्यांनी फेर धरत नृत्य केले. चिमुकल्या बालगोपाळांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यानंतर विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. दहीहंडी फोडल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले आणि उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
भारतीय संस्कृती, परंपरा आणि विविध सणांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, तसेच त्यांना सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी, यासाठी शाळेत विविध सण-उत्सव साजरे केले जातात. याच उपक्रमांतर्गत दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्ञानदीप बालभवन व ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य भरत मोरे यांनी मार्गदर्शन केले. बालभवनच्या शिक्षिका जयश्री शिरसाट, दर्शना गोरीवले, कस्तुरी चोणकर, लीना मेस्त्री, शमिका ढवण आणि कविता खेडेकर यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी व यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष रमणलाल तलाठी, संस्थेचे सरचिटणीस माधव पेठे, सीबीएसई स्कूल नियामक मंडळाचे चेअरमन प्रफुल्ल महाजन, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी तसेच विविध विभागांचे चेअरमन दीपक लढ्ढा, चंदनशेठ पाटणे, अनिल शिवदे आणि संस्थेचे पदाधिकारी व सभासद यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.