खेड (प्रतिनिधी) : विद्यार्थी हा आपल्यासाठी देव असून शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी झटणारा आदर्श माळी आहे, या भावनेतून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माणी नं. १ शाळेच्या पदवीधर शिक्षिका दिप्ती दिलीप यादव यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेचा सन २०२६-२७ चा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल खेड तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
दिप्ती यादव यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीची सुरुवात देवघर विद्यामंदिर जिल्हा परिषद शाळेतून केली. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यानंतर मोहाने-ऐनवली केंद्र शाळेत कार्यरत असताना त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १०० टक्के लावला. तसेच इन्फोसिस कंपनीच्या माध्यमातून शाळेला चार संगणक कक्ष उपलब्ध करून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
खेड नं. २ शाळेत कार्यरत असताना त्यांनी पुन्हा शिष्यवृत्ती परीक्षेत १०० टक्के निकाल मिळवून दिला. विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती राहावी यासाठी विविध उपक्रम राबविले. वाडी बीड शाळेतील त्यांच्या कार्यकाळात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी त्यांनी विशेष योगदान दिले. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. त्यातील एका विद्यार्थिनीची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली.
दिप्ती यादव या कवयित्री असून त्यांच्या कविता विविध मासिके, वर्तमानपत्रे आणि कवितासंग्रहांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. सध्या माणी नं. १ शाळेत पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत असताना त्यांनी कला, क्रीडा, शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम, जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, सभापती आफिया पालेकर, उपसभापती सुनील मोरे, खेडचे गटविकास अधिकारी विजय करपे, गटशिक्षणाधिकारी गायत्री माने, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे चेअरमन सुनील दळवी, माजी चेअरमन सुनील सावंत, शिक्षक समितीचे खेड तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण आणि संघटना प्रवक्ते शैलेश पराडकर यांनी दिप्ती यादव यांचे अभिनंदन केले आहे.












