अमेय तेंडोलकर मित्रमंडळाच्या गोविंदांचा पुढाकार
‘गोविंदा रे गोपाळा ‘ चा जयघोष : नागरीकांमध्ये उत्साह
सावंतवाडी । प्रतिनिधी : ‘गोविंदा रे गोपाळा’च्या उत्स्फूर्त जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात गोविंदा पथकांनी मैदानात उतरून दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. येथील अमेय तेंडोलकर मित्रमंडळाच्यावतीने आयोजित मानाची दहीहंडी फोडून सावंतवाडी शहरातील उर्वरित दहीहंड्या फोडण्याचा शुभारंभ करण्यात आला. हा चित्तथरारक सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी सावंतवाडीकरांनी परिसर अक्षरशः फुलून गेला होता.
उत्सवाची सुरुवात पडते यांच्या निवासस्थानातील श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आली. तेथून श्रीकृष्ण मूर्ती घेऊन गोविंदा पथक पुढे मार्गस्थ झाले. संस्थानकालीन ऐतिहासिक मुरलीधर मंदिरात धार्मिक विधी आणि महाआरती पार पडली. त्यानंतर एका चिमुकल्या गोविंदाने मानवी थरावर चढून मानाची दहीहंडी फोडली आणि उपस्थितांच्या टाळ्यांच्या कडकडाटात जल्लोष करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मंडळाचे अध्यक्ष अमेय तेंडोलकर यांनी सांगितले की, सामाजिक भान जपत अमेय तेंडोलकर मित्रमंडळाच्या वतीने गेली १५ वर्षे हा उत्सव अविरतपणे साजरा केला जात आहे. या उत्सवाच्या माध्यमातून जमा होणारा निधी सामाजिक उपक्रमांसाठी व्यतीत केला जातो. सर्वधर्मांचे युवक एकत्र येऊन बंधुभावाने हा सण साजरा करतात, हीच या उत्सवाची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
मानाची हंडी फुटल्यानंतर श्रीकृष्णाची मूर्ती बाजारपेठेतून मिरवणुकीने विसर्जन स्थळाकडे नेण्यात आली. या मिरवणुकीदरम्यान शहरातील चौकाचौकांत उभारण्यात आलेल्या इतर दहीहंड्या गोविंदांनी मोठ्या जल्लोषात फोडल्या. या संपूर्ण सोहळ्यात मंडळाचे अध्यक्ष अमेय तेंडोलकर, सभापती प्रतीक बांदेकर, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, विनायक ठाकूर, अरुण घाडी, संदीप इंगळे, मयूर लाखे, धनंजय परब, सनी जाधव, दिनेश जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने गोविंदा आणि नागरिक उपस्थित होते.













