शिरगांव (प्रतिनिधी) :
फोंडाघाट येथे झालेल्या जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धेत देवगड तालुक्यातील पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयाचा विद्यार्थी रोहित संजय चव्हाण याने उंच उडीत प्रथम क्रमांक पटकावत नेत्रदीपक यश संपादन केले.
फोंडाघाट येथील संजय आंग्रे मित्र मंडळाच्या वतीने ४ सप्टेंबर रोजी आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रोहितने उंच उडी क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला.
या यशाबद्दल रोहितला प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
त्याला महाविद्यालयाचे क्रीडाप्रमुख प्रा. आशय सावंत, प्रा. अक्षता मोंडकर व प्रा. सिद्धी कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
रोहितने मिळविलेल्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष अरुण कर्ले, संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी, महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम, मानद अधीक्षक सुधीर साटम व प्राचार्य समीर तारी यांनी त्याचे अभिनंदन केले.











