कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी
एक्सप्रेसलाही दंडवतेंच नाव द्या
सावंतवाडी पुणे रेल्वे सेवा सुरू करा
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘लोकमान्य प्रा. मधु दंडवते टर्मिनस’ असे नाव देण्याचा निर्णय झाला असला, तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी त्वरित व्हावी आणि कोकण रेल्वेच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या प्रा. मधु दंडवते यांचे नाव एका विशेष एक्स्प्रेसला देखील देण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची मोठी संख्या विचारात घेऊन पुणे ते सावंतवाडी अशी थेट नवीन रेल्वे सेवा सुरू करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
नियमित एक्स्प्रेसचे सावंतवाडी स्थानकात वेळेपूर्वी आगमन झाल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे स्वागत आणि अभिनंदन करताना उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी विविध समस्यांवर लक्ष वेधले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन आवश्यक ती खबरदारी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित असून, तो जलद गतीने सोडवण्याचे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांनी दिले आहे. त्या आश्वासनानुसार प्रत्यक्षात गतीने काम व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रा. मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या अथक प्रयत्नांमुळेच कोकण रेल्वेचे स्वप्न साकार झाले आहे. आजच्या मुंबई-गोवा महामार्गाच्या बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचे महत्त्व अधिक अधोरेखित होत असून, प्रा. दंडवते यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यामुळे स्थानकाच्या नामकरणासोबतच सावंतवाडी टर्मिनसवर प्रस्तावित रेल्वे ट्रॅक उभारणीचे काम वेगाने पूर्ण करून प्रवाशांचा प्रवास अधिक जलद करावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली.
या प्रसंगी बोलताना संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी आजचा क्षण ऐतिहासिक असल्याचे सांगत स्थानकावर प्लॅटफॉर्म, अतिरिक्त ट्रॅक आणि पाण्याची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची विनंती केली. केंद्र शासनाकडून कोकण रेल्वेच्या विकासासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकासकामांमध्ये कोकण रेल्वे प्रशासनाकडून सावंतवाडी स्थानकाचा प्राधान्याने उल्लेख करून निधीचा योग्य वापर व्हावा, असेही मिहीर मठकर यांनी स्पष्ट केले.













