रत्नागिरी :
आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीची २५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाने राज्यात एक महिना “सेवा संकल्प अभियान” राबविण्याचा ऐतिहासिक व दूरगामी निर्णय घेतला आहे. “सेवा परमो धर्म:” ही केवळ एक उक्ती नसून ती प्रत्यक्ष कृतीत आणून प्रशासनाला थेट सर्वसामान्य नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा हा एक संवेदनशील व गतिमान प्रयत्न आहे.
‘सेवा सेतू अभियान’ : नागरिकांच्या हक्कांची जलद पूर्तता
या अभियानाचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे प्रत्येक तालुका स्तरावर आयोजित होणारी ‘सेवा सेतू शिबिरे’. शासकीय कार्यालयांचे उंबरठे न झिजवता, ‘आपले सरकार सेवा केंद्रां’च्या माध्यमातून एकाच छताखाली तातडीने अर्ज निकाली काढून थेट लाभ देण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे.
या शिबिरांतर्गत महसूल, सामाजिक न्याय, कृषी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडित २२ महत्त्वपूर्ण सेवा नागरिकांना थेट उपलब्ध केल्या जाणार आहेत:
जमीन व महसूल सक्षमीकरण: प्रलंबित फेरफार नोंदीचा जलद निपटारा, ‘जिवंत सातबारा मोहीम’, ७/१२ व ८-अ नोंदी अद्ययावत करणे, गावठाणातील नागरिकांना ‘स्वामित्व सनद’ वाटप, जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार मोजणीशी जोडणे आणि वन हक्क दाव्यांचा निकाल.
शेतकरी व ग्रामीण विकास: ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते’ उपलब्ध करणे, ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने’त सिंचन विहिरींसाठी ऑनलाइन नोंदणी आणि महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप.
नागरी व सामाजिक लाभ: दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, नॉन-क्रिमीलेअर, जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी प्रमाणपत्रे; शिधापत्रिका वाटप, घरगुती वीज व नवीन नळ जोडणी मंजुरी.
‘सेवा माझे योगदान’ लोकसहभागातून समाजपरिवर्तन
प्रशासन आणि जनता यांच्यातील दरी मिटवून एकसंध समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येक गावात आणि प्रभागात ‘सेवा योगदान’ उपक्रम राबविला जाणार आहे.
स्वच्छता व पर्यावरण: समुद्रकिनारे, नद्यांचे घाट, बारवांची स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्ती आणि जलसंधारण.
आरोग्य व सामाजिक बांधिलकी: रक्तदान शिबिरे, सर्वसमावेशक आरोग्य तपासणी, अनाथालय व वृद्धाश्रम भेटी, महिलांचे आरोग्य-पोषण जनजागृती आणि व्यसनमुक्ती मोहीम.
उद्याची सज्जता: ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता, युवकांसाठी करिअर समुपदेशन, सायबर सुरक्षा मार्गदर्शन आणि ‘व्होकल फॉर लोकल’ला प्रोत्साहन.
नाविन्यता आणि भावी पिढीची स्वप्ने
राज्यस्तरीय इनोव्हेशन चॅलेंज: राज्यातील युवा संशोधक, स्टार्टअप्स आणि ग्रामीण भागातील कल्पक व्यक्तींच्या नवकल्पनांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हे चॅलेंज आयोजित केले जाईल.
शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा: ‘विकसित भारत-२०४७’ आणि ‘माझ्या स्वप्नातील भारत’ या संकल्पनेवर राज्यभरातील शाळांमध्ये चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातील, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशविकासाची जाणीव रुजेल.
मातृत्व आणि बालकांचा सन्मान : ‘अंगणवाडी उत्सव’
अंगणवाडी केंद्रांवर मातांना आमंत्रित करून पोषण व आरोग्य योजनांची माहिती दिली जाईल. मुलांसाठी मनोरंजक कार्यक्रम आणि खाऊवाटप केले जाईल. समाजाचा पाया मजबूत करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा कार्यकर्त्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात येईल.
प्रेरणादायी लोकसंवाद उपक्रम
आशीर्वादाचा दिवा: शासकीय योजनांमुळे ज्या कुटुंबांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आला, अशा लाभार्थ्यांच्या घरी शासकीय अधिकारी प्रत्यक्ष जाऊन कृतज्ञतेचा ‘आशीर्वादाचा दीप’ प्रज्वलित करतील.
बदलाची गोष्ट व नमो सेवागाथा: लाभार्थ्यांच्या यशोगाथा व्हीडिओ आणि रील्सच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपात जतन करून प्रसारित केल्या जातील. तसेच पथनाट्य आणि कलापथकांच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजनांची माहिती थेट लोकांपर्यंत पोहोचवली जाईल.
सांगता : ‘जनसेवक महाकुंभ’
या महिनाभराच्या लोकसेवेच्या महायज्ञाची सांगता १७ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य ‘जनसेवक महाकुंभाने’ होईल. ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून ते संसदेच्या खासदारांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधी एकाच व्यासपीठावर एकत्र येतील. माननीय पंतप्रधानांच्या उपस्थितीत सर्व लोकप्रतिनिधी ‘विकसित भारत-२०४७’ चा सामूहिक संकल्प घेऊन या अभियानाची यशस्वी सांगता करतील.
सुशासनाचा नवा आदर्श
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय, विभागीय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली विभागीय, आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरीय समित्यांद्वारे या संपूर्ण अभियानाचे काटेकोर संनियंत्रण केले जाणार आहे.
‘सेवा संकल्प अभियान’ हे केवळ प्रशासकीय शिबिरांपुरते मर्यादित नसून, ते जनतेच्या सहभागातून उभे राहिलेले “लोककल्याण आणि संवेदनशील प्रशासनाचे” एक भव्य प्रतीक ठरणार आहे. चला, या सेवा पर्वात आपण सर्वजण सक्रिय सहभागी होऊया!
– प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी











