रत्नागिरी: गणेशोत्सवाच्या कालावधीत सर्वसामान्यांना घरपोच आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्यावतीने संपूर्ण राज्यभरात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ हे विशेष अभियान राबवले जात आहे. जिल्ह्यातही ‘श्रीगणेशा आरोग्याचा, निरोगी रत्नागिरीचा’ या संकल्पनेंतर्गत सलग १० दिवस विविध शासकीय रुग्णालये तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार सेवा सुरू करण्यात आली आहे.*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविला जात आहे. या आरोग्य सेवा मिळणार मोफत
या अभियानांतर्गत शासकीय आणि खासगी वैद्यकीय संस्थांच्या सहकार्याने पुढील तपासण्या मोफत केल्या जात आहेत:
* सामान्य शारीरिक तपासणी व औषधोपचार
* रक्तदाब (BP) आणि मधुमेह (Sugar) तपासणी
* कर्करोग (Cancer) प्राथमिक तपासणी
* ईसीजी (ECG) व आवश्यक रक्तचाचण्या
* असंसर्गजन्य आजारांचे (NCD) प्राथमिक निदान
गावोगावी आरोग्य यंत्रणा सज्ज
जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, शहरी आरोग्य केंद्रे तसेच ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या सर्व केंद्रांवर ही मोफत तपासणी सुरू आहे. यासोबतच गर्दीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये विशेष आरोग्य शिबिरे भरवण्यात येत असून मंडळांकडूनही याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय आणि खासगी रुग्णालयांच्या संयुक्त सहकार्याने या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अधिक माहिती व मदतीसाठी जिल्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमित सावंत, समाजसेवा अधीक्षक केदार ढेकणे व लिपीक अमित कोरेगावकर यांच्याशी ८८३०१४७२९५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.












