श्री सुकाई देवी देवस्थान रस्ता काँक्रिटीकरण व कातळवाडी पाणीप्रश्नी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट

 उमेश खताते व देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचे निवेदन

 पाणीप्रश्न तातडीने सोडविण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील खेर्डी गावातील श्री सुकाई देवी देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचे संपूर्ण सिमेंट काँक्रिटीकरण करणे, तसेच कातळवाडी येथील तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे पदाधिकारी आणि श्री सुकाई देवी देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही महत्त्वाच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करून पालकमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. खेर्डी येथील श्री सुकाई देवी देवस्थान हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा काही भाग मंजूर झाला असला, तरी रस्ता अद्याप पूर्णपणे काँक्रिटीकरण झालेला नाही. खेर्डी ते टेरव रस्त्याच्या सुमारे ८०० मीटर भागाचे अर्धवट काँक्रिटीकरण मंजूर करण्यात आले आहे. मात्र, भाविक आणि ग्रामस्थांना मंदिरापर्यंत जाण्यासाठी उर्वरित रस्त्याचीही आवश्यकता आहे. ही अडचण दूर करण्यासाठी खेर्डीपासून थेट श्री सुकाई देवी मंदिरापर्यंतच्या उर्वरित रस्त्याचे संपूर्ण सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कैलास शेंबेकर आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास भाविकांची तसेच ग्रामस्थांची ये-जा अधिक सुलभ होणार असून, देवस्थान परिसराच्या विकासालाही चालना मिळणार आहे. कातळवाडीतील पाणीप्रश्नावर तातडीने दखल यावेळी खेर्डी गावातील कातळवाडी परिसरात गेल्या १५ दिवसांपासून निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे शिवसेना पदाधिकारी उमेश खताते यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिले.
नागरिकांच्या पाणीसमस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्री उदय सामंत यांनी तत्काळ कार्यवाही केली. त्यांनी बैठकीतूनच पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत कातळवाडी येथील पाणीप्रश्नाला प्राधान्य देऊन तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश दिले. तसेच हा प्रश्न केवळ तात्पुरता न सोडविता कायमस्वरूपी मार्ग काढण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. या भेटीप्रसंगी उमेश खताते यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी विराज खताते, अखिलेश खेडेकर, समीर कदम, सचिन खताते आदी उपस्थित होते. तसेच श्री सुकाई देवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कैलास भाऊ शेंबेकर, विश्वस्त सुधाकर दाते आणि विश्वस्त निलेश शिगवण यांची उपस्थिती होती. पालकमंत्री उदय सामंत यांनी रस्ता आणि पाणीप्रश्नाची दखल घेतल्याने दोन्ही समस्या लवकर मार्गी लागण्याची आशा ग्रामस्थ आणि भाविकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.