करूळच्या विकासात मोलाचे योगदान
कणकवली : तालुक्यातील करूळ गावचे माजी सरपंच तथा काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते दत्तात्रय देऊ फोपे (वय सुमारे ८५) यांचे वृद्धापकाळाने मुंबई येथे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अधिक उपचारासाठी त्यांना मुंबई येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने करूळ गावासह कणकवली तालुक्यातील सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
दत्तात्रय फोपे यांनी करूळ ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून तब्बल सलग २९ वर्षे काम पाहिले. एवढ्या प्रदीर्घ काळ सरपंचपद भूषविण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. त्यांच्या कारकिर्दीत करूळ गावाच्या विकासाला मोठी चालना मिळाली. त्यांच्या नेतृत्वाखाली करूळ ग्रामपंचायतीला आदर्श गाव, निर्मल ग्राम यांसह विविध पुरस्कार मिळाले होते.
शासकीय योजनांचा सखोल अभ्यास असलेले अभ्यासू सरपंच म्हणून दत्तात्रय फोपे यांची तालुका पातळीवर विशेष ओळख होती. ग्रामविकासासाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना व निधी यांचा पुरेपूर अभ्यास करून त्याचा गावाच्या विकासासाठी उपयोग करून घेण्यावर त्यांचा भर असे. योजनांचा अभ्यास असल्याने संबंधित अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याची त्यांची खासियत होती. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात करूळ ग्रामपंचायतीने विविध विकासकामांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली.
सरपंचपदाची कारकीर्द संपल्यानंतरही तालुका व जिल्हा पातळीवर त्यांची ओळख ‘फोपे सरपंच’ अशीच होती. करूळ रामेश्वर सोसायटीचे चेअरमन म्हणूनही त्यांनी काही काळ जबाबदारी सांभाळली. गावच्या विकासाबरोबरच सहकार क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले. दत्तात्रय फोपे हे सुरुवातीच्या काळापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते.
राजकारणाचा गाढा अभ्यास असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांचा नावलौकिक होता. स्थानिक राजकारणापासून ग्रामविकासाच्या प्रश्नांपर्यंत विविध विषयांवर त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींशी त्यांचे आत्मीय संबंध होते. दत्तात्रय फोपे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सुना, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ८ वाजता करूळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.











