रक्तदानाच्या पवित्र कार्यात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे” — आ. दीपक केसरकर

​सावंतवाडीत रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात; डॉ. अरविंद खानोलकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

​सावंतवाडी:
रक्तदान हे अत्यंत पवित्र कार्य असून गरजू रुग्णांना थेट जीवनदान देणारे श्रेष्ठ माध्यम आहे. अपघात, गंभीर आजार तसेच विविध वैद्यकीय उपचारांदरम्यान अनेक रुग्णांना तातडीने रक्ताची गरज भासते. अशा वेळी रक्तदात्यांनी केलेले रक्तदान एखाद्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी अत्यंत मोलाचे ठरते. त्यामुळे नागरिकांनी रक्तदानाबाबत व्यापक जनजागृती करून नियमितपणे या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केले. सावंतवाडीत दीर्घकाळ वैद्यकीय सेवा देणारे बालरोगतज्ज्ञ डॉ. अरविंद खानोलकर यांचे योगदान मोलाचे असून त्यांच्या कार्याचा वारसा कुटुंबाने असाच पुढे चालू ठेवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

​घे भरारी फाउंडेशन सावंतवाडी, सावंतवाडी पोलीस, डॉक्टर फ्रॅटर्निटी क्लब, ओंकार कलामंच आणि श्री औदुंबर स्वामी मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै. डॉ. अरविंद खानोलकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अत्यंत व्यस्त वेळापत्रक असतानाही डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमासाठी वेळ दिल्याबद्दल आमदारांनी त्यांचे विशेष कौतुक केले. तसेच पोलीस प्रशासन, वैद्यकीय क्षेत्र, सामाजिक संस्था आणि मंदिर समितीने एकत्र येऊन हा उपक्रम राबवल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.

​याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. भागवत यांनी शिबिराला शुभेच्छा देताना सांगितले की, आयोजकांकडून राबवण्यात आलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि समाजासाठी प्रेरणादायी आहे. या शिबिराच्या माध्यमातून रक्तदानासोबतच नागरिकांना आरोग्य तपासणीची उत्तम सुविधा उपलब्ध झाली आहे, तरी गरजू नागरिकांनी अशा आरोग्यविषयक उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

​या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगरसेवक विणा जाधव, सभापती मोहिनी मडगावकर, डॉ. राजेश नवांगुळ, डॉ. मिलिंद खानोलकर, डॉ. अभिजीत चितारी, डॉ. संजना देसकर, माजी नगरसेवक विलास जाधव, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, घे भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष ज्योती दुधवडकर, अमोल टेंबकर, भुवन नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

​हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांसह अमित राऊळ, मेघना राऊळ, प्रिया रेडीज, मेघा डुबळे, मेघना साळगावकर, प्रशांत सावंत, आनंद काष्टे, हेमंत पांगम, साहिल सावंत आणि श्रेयस मुंज यांनी विशेष परिश्रम घेतले.