२५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय
कणकवली : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी प्रणय उर्फ गणेश प्रकाश सावंत (रा. नाधवडे, ता. वैभववाडी) याला ओरोस येथील अतिरिक्त सत्र न्यायालय क्रमांक १ चे न्यायाधीश श्री. एस. एस. इंदलकर यांनी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. आरोपीच्या वतीने अॅड. अक्षय चिंदरकर यांनी न्यायालयात काम पाहिले.
या प्रकरणी २५ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा, तसेच तिला व तिच्या आईला धमकी देऊन शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५(२), ७५(३), ७६, ७९ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर २६ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपीला अटक करण्यात आली होती.
आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना त्याच्या वतीने जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
जामीन मंजूर करताना न्यायालयाने आरोपीला काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार आरोपीने तपासकामात सहकार्य करावे, फिर्यादी अथवा सरकारी पक्षाच्या साक्षीदारांवर दबाव आणू नये, फिर्यादीशी संपर्क साधू नये किंवा तिच्या राहत्या ठिकाणी जाऊ नये, सरकारी पक्षाच्या पुराव्यांमध्ये ढवळाढवळ करू नये आणि पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करू नये, अशा अटींचा समावेश आहे.









