मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कणकवली : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची नियमित तपासणी व्हावी तसेच त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेऊन आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या आरोग्य तपासणी शिबिराला कणकवली परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरामध्ये उपस्थित ज्येष्ठ नागरिकांची विविध प्रकारची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांच्या आरोग्यविषयक अडचणी जाणून घेत त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील, डॉ. माधव उबाळे, डॉ.प्रविण गोरुले, आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे, मंदार फाले, श्रीमती सोनिया नाणेरकर, श्रीमती निता दाभोळकर, श्रीमती सलिम कमलापूरकर, प्रथमेश परब, संतोष नाईक, सुशील परब,श्रीम.भुरके सिस्टर आदी वैद्यकीय व आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच त्यांना वेळोवेळी आरोग्य तपासणी, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि आरोग्यविषयक आवश्यक मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा ज्येष्ठ नागरिकांना मोठा लाभ झाला.












