ग्रामपंचायत कुणकेश्वर व जोगेश्वरी तरुण उत्साही मंडळाचा संयुक्त उपक्रम
पाणीटंचाई व दुष्काळावर मात करण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचा संकल्प
कुणकेश्वर : ग्रामपंचायत कुणकेश्वर आणि जोगेश्वरी तरुण उत्साही मंडळ, खालचीवाडी यांच्या संयुक्त सहभागातून कुणकेश्वर येथील गंगेचा वहाळ येथे वनराई बंधारे बांधण्यात आले. भविष्यात उद्भवणारी पाणीटंचाई तसेच दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून त्याचा योग्य उपयोग व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी आरती पाटील, ग्रामपंचायत कुणकेश्वरचे माजी सरपंच महेश ताम्हणकर, श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली, ग्रामपंचायत अधिकारी गुणवंत पाटील, कृषी सहायक श्री. सोनार, जोगेश्वरी तरुण उत्साही मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश चव्हाण, सचिव विनय परब यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश चव्हाण यांनी सांगितले की, भविष्यातील पाणीटंचाई व दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे गरजेचे आहे. सामाजिक बांधिलकीची भावना डोळ्यासमोर ठेवून मंडळाच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
जोगेश्वरी तरुण उत्साही मंडळामार्फत यापूर्वीही रक्तदान शिबिर, शालेय स्पर्धा यांसह विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. मंडळाच्या या सामाजिक कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करून भविष्यातही अशाच प्रकारे सामाजिक योगदान देण्यासाठी मंडळाला शुभेच्छा दिल्या.












