सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचा उपक्रम
दोन वर्षांत १९ गावांतील १८,९५३ रुग्णांची मोफत तपासणी, औषधोपचारासह १,८२६ जणांची रक्तशर्करा तपासणी
सावंतवाडी : सह्याद्रीच्या दुर्गम आणि ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पोहोचवण्याचे मोठे आव्हान असताना सावंतवाडी येथील सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचा ‘फिरता दवाखाना’ गोरगरीब आणि गरजू रुग्णांसाठी अक्षरशः संजीवनी ठरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यातील १९ गावांमध्ये तब्बल १८ हजार ९५३ रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत १ हजार ८२६ रुग्णांची रक्तशर्कराही मोफत तपासण्यात आली आहे. ‘समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, नव्हे ती आपली जबाबदारी आहे,’ या सामाजिक जाणिवेतून सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान गेल्या १३ वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबवत आहे. त्याच सेवाव्रताचा एक भाग म्हणून ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच प्राथमिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘फिरता दवाखाना’ सुरू करण्यात आला.
या उपक्रमाला मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाऊंडेशन ऑफ साऊथ मुंबई या सेवाभावी संस्थेचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभत आहे. वर्ल्ड प्राणिक हिलींग फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या या संस्थेचे संस्थापक मास्टर चोआ कॉक सुई यांच्या नावाने हा फिरता दवाखाना सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी या उपक्रमाचे लोकार्पण तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले होते.
हा फिरता दवाखाना दोन दिवसाआड सकाळच्या आणि सायंकाळच्या सत्रात विविध गावांमध्ये सेवा देतो. सकाळच्या सत्रात फणसवडे, केसरी, दाणोली-गावठाण, पारपोली, देवसु, ओवळीये, वेर्ले, कुणकेरी आणि आंबेगाव या गावांमध्ये, तर सायंकाळच्या सत्रात न्हावेली, सोनुर्ली, वेत्ये, कास, सातोसे, निगुडे, डिंगणे, गाळेल, डोंगरपाल आणि नेतर्डे या दुर्गम भागात दवाखाना पोहोचतो. सकाळी ८ वाजता सावंतवाडीतून निघणारा दवाखाना दुपारी सुमारे १ वाजता परततो, तर दुपारी २ वाजता सुरू होणारे सायंकाळचे सत्र सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत सुरू असते. प्रत्येक सत्रात दोन ते चार गावांमध्ये सेवा दिली जाते. रविवार आणि महत्त्वाचे सण वगळता हा उपक्रम नियमितपणे सुरू आहे.
गेल्या दोन वर्षांत सकाळच्या सत्रातील सेवेचा ८ हजार ७२८ महिला आणि ५ हजार ९४३ पुरुष अशा एकूण १४ हजार ६७१ रुग्णांनी लाभ घेतला. यावर्षी १ मार्चपासून सुरू करण्यात आलेल्या सायंकाळच्या सत्रात २ हजार ६६३ महिला आणि १ हजार ६१९ पुरुष अशा एकूण ४ हजार २८२ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. अशा प्रकारे दोन्ही सत्रांत मिळून आतापर्यंत १८ हजार ९५३ रुग्णांना आरोग्यसेवेचा लाभ मिळाला आहे. या फिरत्या दवाखान्यात तपासणीसोबतच रुग्णांना आवश्यक औषधेही मोफत दिली जातात. त्यामुळे उपचारांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्याचा प्रवासखर्च, वेळ आणि औषधांचा खर्च वाचत असल्याने ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. फिरत्या दवाखान्याच्या वाहनातच रुग्णांच्या तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनात डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णांसाठी आसनव्यवस्था, बेसिन, तपासणी कक्ष तसेच औषध विभागाची सुविधा आहे. डॉ. स्वप्नील परब, डॉ. नेहा परब, परिचारिका श्वेता सावळ आणि कोमल सावंत, चालक सुहास धुरी तसेच कार्यालयीन कामकाजासाठी लिपिक वेदा गुरव यांच्याकडून सेवा दिली जात आहे. सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रविणकुमार ठाकरे आणि त्यांचे सहकारी गेल्या १३ वर्षांपासून जनसामान्यांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबवत आहेत. फिरत्या दवाखान्याची जबाबदारी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते दीपक गावकर आणि भगवान रेडकर पाहत आहेत.
डॉ. ठाकरे यांच्या माध्यमातून विविध स्वयंसेवी संस्थांच्या उपक्रमांचा लाभ गरजूंना मिळवून देण्याचे काम सुरू आहे. त्याच सेवाभावी प्रयत्नातून योग विद्या प्राणिक हिलींग फाऊंडेशन ऑफ साऊथ मुंबईच्या सहकार्याने दुर्गम भागासाठी ‘ग्रँड मास्टर चोआ कॉक सुई फिरता दवाखाना’ सुरू करण्यात आला आहे. “गोरगरीब आणि गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच आमच्या आरोग्यसेवेचे खरे यश आहे. पुढील काळात या सेवेचा विस्तार करून आणखी दुर्गम भागापर्यंत पोहोचण्याचा प्रतिष्ठानचा संकल्प आहे,” असे डॉ. ठाकरे यांनी सांगितले. सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या वतीने दुर्गम आणि ग्रामीण भागात आतापर्यंत ३५ मोफत आरोग्य शिबिरे घेण्यात आली असून, त्यात ३ हजार ८४७ रुग्णांची तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली. तसेच १६ शाळांमधील ७३७ विद्यार्थ्यांची रक्तगट आणि हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली आहे.
प्रतिष्ठानच्या कै. डॉ. डी. बी. खानोलकर रुग्ण सेवा केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत ८७१ गरजूंना रुग्णोपयोगी साहित्य मोफत वापरण्यास देण्यात आले आहे. कोविड काळातील सेवाकार्यासोबतच गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत, शैक्षणिक साहित्य वाटप, २० शाळांमध्ये ‘शब्दगंध’ वाचनालय आणि शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांचे वार्षिक शिवव्याख्यान असे विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रमही प्रतिष्ठानकडून सुरू आहेत.दुर्गम भागातील रुग्णांना उपचारासाठी शहराची वाट धरावी लागू नये, त्यांच्या गावातच प्राथमिक आरोग्यसेवा आणि औषधे उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने सुरू झालेला हा फिरता दवाखाना आज अनेक कुटुंबांसाठी केवळ वैद्यकीय सेवा नव्हे, तर आरोग्याचा आणि विश्वासाचा आधार बनला आहे.













