दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मेघा इंगावले ॲक्शन मोडमध्ये

पिकपाहणी व पंचनाम्यात एकही शेतकरी वंचित राहता कामा नये

चिपळूण (प्रतिनिधी) : पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आगामी काळात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत पंचायत समिती सदस्य मेघा योगेश इंगावले यांनी बैठक घेतली. यावेळी पिकपाहणी व शेतीपंचनाम्याच्या प्रक्रियेत एकही शेतकरी वंचित राहू नये, याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
“पिकपाहणी आणि शेतीपंचनामे करताना माझा एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची काळजी घ्या. शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करा,” असे मेघा इंगावले यांनी स्पष्ट केले. पिकांचे नुकसान, पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती तसेच शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी यांची नोंद योग्य पद्धतीने होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. गावातील ग्रामस्थही या महत्त्वाच्या कामात प्रशासनाला सहकार्य करतील. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी समन्वयाने काम करून पिकपाहणी व पंचनाम्याची प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
पावसाचे प्रमाण आणि उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता दसपटी भागात भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टँकरची व्यवस्था ऐनवेळी न करता आतापासूनच त्याचे नियोजन करावे, अशी मागणी मेघा इंगावले यांनी केली. तसेच भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी बंधारे, पाणी साठवणूक आणि पाणी अडविण्याच्या कामांचे नियोजन पाणी विभागाने तातडीने करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
या बैठकीत स्वप्नील शिंदे, विजय टाकळे, भाऊ जागुष्टे आणि दयानंद शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बैठक घेऊन त्यांची दखल घेतल्याबद्दल उपस्थितांनी मेघा इंगावले यांच्या पुढाकाराचे व स्तुत्य कामाचे कौतुक केले. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच प्रशासनाने सज्ज राहून शेतकरी, पाणी आणि शेतीच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना कराव्यात, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे मेघा इंगावले यांनी सांगितले. यावेळी विजय टाकळे, स्वप्नील शिंदे, भाऊ जागुष्टे, प्रकाश पवार, विश्वनाथ शेट्ये, सोनाली कदम, दयानंद शिंदे, किशोर कदम, गजानन साळवी, तानाजी चव्हाण, विलास भुवड, जयवंत अदावडे, धर्मेन्द्र शिंदे, शरद सकपाळ, दिलीप अदावडे, संदीप कदम, अनंत वारोसे, नितेश निकम, संजय जगताप, संतोष सुतार, ग्रामसेवक,तलाठी आदी मान्यवर उपस्थित होते.