राजापूर प्रतिनिधी: राजापूर शहरातील सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीररीत्या मासे विक्री करून घाण व दुर्गंधी पसरवणाऱ्या नाटे परिसरातील ६ महिला विक्रेत्यांवर राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापूर नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाच्या पथकाने मंगळवारी सकाळी ही धडक कारवाई केली आहे. सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण केल्याप्रकरणी नगर परिषद कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर शहरातील शिवाजी पथ ते मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या मार्गावर महालक्ष्मी हॉटेलसमोर काही महिला रस्त्यावर बसून अवैधपणे मासे विक्री करत होत्या. ती मंगळवार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:२० वाजण्याच्या सुमारास नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक, मुकादम आणि सफाई कर्मचारी यांनी ही प्रत्यक्ष कारवाई केंली. संबंधित महिला भररस्त्यात बसून मासे विक्री करत होत्या. तसेच माशांची खवले, टाकाऊ अवशेष आणि दुर्गंधीयुक्त पाणी थेट रस्त्यावर फेकून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत होता.
याप्रकरणी राजापूर नगर परिषदेचे स्वच्छता मुकादम राजन रामचंद्र जाधव (वय ५५ वर्षे, रा. धोपेश्वर पन्हळे, राजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजापूर पोलिसांनी १) सादिका फणसोपकर, २) शाहिन फणसोपकर, ३) अक्सा समिर सोलकर, ४) नाजिया वाडकर, ५) अनिसा रशिद सोलकर आणि ६) सुमय्या बोरकर (सर्व रा. नाटे, ता. राजापूर) यांच्याविरुद्ध गु.र.नं. २६५/२०२६, महाराष्ट्र नगरपालीका अधिनियम १९६५ चे कलम २६७, २६९ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Home महत्वाच्या बातम्या राजापुरात रस्त्यावर मासे विक्री सहा महिलांविरोधात राजापुर पोलीसांत गुन्हा दाखल













