प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विरोधकांना ३ थेट सवाल
मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेबाबत मांडलेल्या भूमिकेचा व्हिडिओ शेअर करत भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर घणाघाती हल्ला चढवला आहे. एसआयआर प्रक्रियेला तीव्र विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना चव्हाण यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून धारेवर धरत तीन थेट आणि परखड सवाल उपस्थित केले आहेत.
संसदेतील गृहमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करत भाजप प्रदेशाध्यक्षांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री कोण असावे हे परदेशी घुसखोरांनी ठरवायचे का आणि असे झाले तर आपल्या देशातील लोकशाही सुरक्षित राहील का, असा पहिला सवाल त्यांनी विचारला आहे. यासोबतच एकाच मतदाराला एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदान करण्याची मुभा असायला हवी का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी दुबार मतदानाला विरोधकांच्या पाठिंब्यावर शंका व्यक्त केली आहे. तसेच मृत्यू पावलेल्या नागरिकांची नावे मतदार यादीत कायम असावीत का, असा तिसरा सवाल करत त्यांनी बोगस मतदानाच्या मुद्द्यावरून विरोधकांना घेरले आहे.
ठाकरे बंधूंकडून काढण्यात येणाऱ्या ‘गर्जना मोर्चा’चा समाचार घेताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, पारदर्शक मतदार याद्या आणि निकोप लोकशाहीसाठी एसआयआर प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. या प्रक्रियेला विरोध करणाऱ्यांनी आधी देशाच्या आणि राज्याच्या हिताशी संबंधित असलेल्या या तीन प्रश्नांची उत्तरे जनतेला द्यावीत आणि त्यानंतरच विरोध करावा, असे थेट आव्हान त्यांनी दिले आहे. एसआयआरवरून सुरु असलेल्या या राजकीय गदारोळात भाजप प्रदेशाध्यक्षांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील कलगीतुरा अधिकच रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.













