धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आकाशवाणी रत्नागिरीतर्फे ‘अमृतवाणी बुद्धाची’ विशेष सुगम संगीत सभा

रत्नागिरी : भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या संदेशाचा जागर करण्यासाठी ७१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आकाशवाणी रत्नागिरीतर्फे ‘अमृतवाणी बुद्धाची’ या विशेष सुगम संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही विशेष संगीत सभा रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत आकाशवाणी रत्नागिरीच्या थिबा पॅलेस रोड येथील परिसरात आयोजित करण्यात आली आहे.

भगवान बुद्धांनी दिलेला करुणा, मैत्री, समता, अहिंसा आणि मानवतेचा संदेश तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेला समता आणि बंधुतेचा विचार संगीताच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा या कार्यक्रमामागील उद्देश आहे. ‘अमृतवाणी बुद्धाची’ या संकल्पनेतून बुद्धविचारांना सुगम संगीताची साथ देत विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमातून बुद्धांच्या विचारांचे चिंतन करण्याची तसेच सुरेल संगीताचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. आकाशवाणी रत्नागिरीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमाला संगीतप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आकाशवाणी रत्नागिरीचे केंद्र संचालक यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता ‘अमृतवाणी बुद्धाची’ या विशेष सुगम संगीत सभेला सुरुवात होणार असून रात्री ८ वाजेपर्यंत हा कार्यक्रम रंगणार आहे