दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने आतापासूनच दक्षता घ्यावी.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाच्या चाऱ्यापाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे आणि मोकाट जनावरांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या सर्व प्रश्नांकडे अधिवेशनाच्या काळात आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधून त्यावर ठोस उपाययोजना करण्याची विनंती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा पशुसंवर्धन सभापती दादा साईल यांनी दिली.
दरम्यान, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक गोशाळा उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करा, असे स्पष्ट निर्देश साईल यांनी पशुसंवर्धन विभागाला दिले. जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीची सभा गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दादा साईल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी संतोष पारकर, गणेश राणे, शितल दळवी, श्वेता धरणे, पशुसंवर्धन विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त रवींद्र दळवी आदी उपस्थित होते.
दुष्काळात पशुधनाची उपासमार होऊ नये यासाठी आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना साईल यांनी दिल्या. जनावरांसाठी पिण्याचे पाणी तसेच पुरेसा चारा उपलब्ध राहील, यासाठी पशुसंवर्धन विभागाने दक्ष राहावे. दुष्काळी परिस्थितीत विभागाची यंत्रणा कमी पडू नये, यासाठी रिक्त पदांचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण स्वतः आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी मका बियाण्याचे वितरण करण्यात येणार असून, स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात घेऊन त्याचे वाटप करा, असे निर्देशही साईल यांनी दिले.
मोकाट जनावरांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना
जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांसोबतच मोकाट जनावरांचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ग्रामपंचायत अथवा नगरपंचायत स्तरावर कोंडवाड्यांची पुरेशी व्यवस्था नसल्याने मोकाट जनावरांचा प्रश्न निर्माण होत असल्याकडे समिती सदस्यांनी लक्ष वेधले. या पार्श्वभूमीवर केवळ तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी प्रत्येक तालुक्यात गोशाळा उभारण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करून पुढील कार्यवाही करा, असे आदेश दादा साईल यांनी दिले.
दुष्काळ, चारा-पाण्याची संभाव्य टंचाई आणि मोकाट जनावरांचा वाढता प्रश्न या तिन्ही बाबींचा एकत्रित विचार करून पशुधन संरक्षणासाठी जिल्ह्यात नियोजनबद्ध यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.













