ज्येष्ठ खासदार शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर
संतोष कोत्रे
लांजा-: विलवडे रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेने पुन्हा मोर्चे बांधणी सुरु केली असून शिष्टमंडळाने ज्येष्ठ खासदार शरदचंद्र पवार यांची भेट त्यांना निवेदन सादर केले.
लांजासह राजापूर तालुक्यातील सुमारे ७०
गावातील रेल्वे प्रवाशांना सोयीचे ठरणाऱ्या लांजा तालुक्यातील विलवडे रेल्वे स्थानकावर जनशताब्दी एक्सप्रेस,नेत्रावती एक्सप्रेस,कोच्युवेली एक्सप्रेस , मत्स्यगंधा एक्सप्रेस व मांडवी एक्सप्रेस या गाड्याना थांबा मिळावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी विलवडे रेल्वे प्रवासी संघटना मुंबई ग्रामीण या संघटनेकडून २० सप्टेंबर २०२६ रोजी विलवडे रेल्वे स्टेशनजवळ लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले होते.
या उपोषणाची दखल घेत रेल्वे
प्रशासनाकडून काही मागण्या मान्य केल्याचे व त्याचबरोबर तशी लेखी आश्वासने पुढील पंधरा दिवसात देऊ असे सांगून उपोषण मागे घ्यायला लावले होते. विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेने सुद्धा जे हाती लागते आहे ते घेऊन सदरचे लाक्षणिक उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.
प्रशासनाने दिलेल्या शब्दाप्रमाणे दिनांक ६ ऑक्टोबर रोजी दिलेल्या पत्रात सध्याच्या फलाटावर पत्रा शेड व आधुनिक प्रतिक्षालय बांधण्याकरीता निधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.विलवडे स्थानक ते मुख्य रस्ता या मार्गाच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने महाराष्ट्र शासन यांचेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.दोन नंबरच्या फलाट बांधण्याकरीता निधीची तूरतद करण्याकरीता २०२७-२८ च्या अंदाजपत्रकात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.तसेच दिव्यांग प्रवाशांना फलाटावर येणे सोयीचे व्हावे यासाठी रॅम्प बनविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे .
मात्र एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळण्याबाबत प्रशासन ठोस पाठपुरावा करीत नाही. म्हणूनच या गाड्यांच्या थांब्याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोकण रेल्वे बोर्डाचे सदस्य असलेल्या खासदार
निलेश लंके यांची भेट घेतली. तसेच ज्येष्ठ खासदार शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन विलवडे रेल्वे स्टेशन बाबतच्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यांनी तात्काळ त्यावरती शेरा मारून संबंधित मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्याचे आपल्या कार्यालयाला आदेश दिले.
भेटीसाठी गेलेल्या शिष्ट मंडळात संघटनेचे कार्याध्यक्ष- रमेश काटकर, सरचिटणीस- राज हांदे, सल्लागार सुभाष लाड, उपाध्यक्ष दीपक जानस्कर व सदस्य प्रकाश तोरस्कर हे उपस्थित होते.













