नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!
रत्नागिरी (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू असून, रत्नागिरी शहरासह परिसरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने हा उत्सव साजरा केला जात आहे. मात्र, याच उत्सवाच्या काळात रत्नागिरी शहरालगतच्या खेडशी-पारसनगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेडशी येथील पारसनगर परिसरातील एका नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मंगळवारी रात्री उत्सवाची कामे आटोपून मंदिरातच झोपले होते. दरम्यान, बुधवारी (१४ ऑक्टोबर) पहाटे सुमारे ३ ते ३.३० वाजण्याच्या सुमारास नवरात्रोत्सव मंडपाजवळ बिबट्याची चाहूल लागल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, पारसनगर हा दाट लोकवस्तीचा परिसर असून, नवरात्रोत्सवानिमित्त या ठिकाणी भाविकांचीही वर्दळ असते. अशा परिस्थितीत मंडपाजवळच बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर आल्याने परिसरातील नागरिकांसह नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक सतर्क झाले असून, रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रात्री उशिरापर्यंत नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, वनविभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन परिसराची पाहणी करावी, बिबट्याच्या वावराची खातरजमा करावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नवरात्रोत्सवाच्या उत्साहात बिबट्याच्या संभाव्य वावरामुळे निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी वनविभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.












