घोणसरीच्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ चे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सुयश !

ग्रामस्थ पालकांकडून मुलांचे कौतुक !

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तरेळे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या, तालुकास्तरीय बाल- कला- क्रीडा व ज्ञानी मी होणार ! स्पर्धेमध्ये घोणसरी नंबर १ शाळेच्या विद्यार्थ्यांनी समूहगान स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून, जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेण्याची संधी पटकावली. त्यांच्या यशामुळे फोंडा प्रभागाच्या यशात मानाचा तुरा खोवला गेला. या स्पर्धेसाठी संगीत साथ देणाऱ्या विद्यार्थी तुषार सुतार, कैलास मेस्त्री, कुणाल राणे,विवेक कारेकर यांनी प्रेक्षकांची, रसिकांची मने जिंकली. या यशासाठी त्यांना मुख्याध्यापक संजना शिरसाट, सहशिक्षिका दीपिका कागले, अस्मिता तावडे, श्रेया नानचे, केंद्रप्रमुख महाले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री किशोर गवस यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले, आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष श्री. गजानन सुतार आणि सदस्य विजय सुतार यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कौतुक करून त्यांचा गौरव केला. विद्यार्थ्यांच्या आणि प्रशालेच्या या दैदीप्यमान यशाबद्दल ग्रामीण भागातील पालक आणि ग्रामस्थ यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे..