आरोस येथे १७ ऑक्टोबरला राज्यस्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा

आरोस, . सावंतवाडी : श्री देवी माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, आरोस यांच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता राज्यस्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आरोस येथील श्री देवी माऊली मंदिरात ही स्पर्धा होणार असून, यामध्ये सात नामांकित भजन मंडळे सहभागी होणार आहेत.

 

कोकणातील पारंपरिक भजन कलेचे जतन व संवर्धन करणे, भजन परंपरेला प्रोत्साहन देणे आणि नव्या पिढीला भजन साधनेची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते २० ऑक्टोबर या कालावधीत सुरू असलेल्या नवरात्रोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या स्पर्धेत स्वरब्रह्म भजन मंडळ, देवगडचे बुवा प्रसाद शेवडे, लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, कणकवलीचे बुवा योगेश मेस्त्री, महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळीचे बुवा प्रसाद आमडोसकर, दत्त प्रासादिक भजन मंडळ, वर्देचे बुवा नरेंद्र मेस्त्री, श्री देव समाधी पुरुष भजन मंडळ, मळगावचे बुवा गौरांग राऊळ, श्री देव इसवटी पंचदेवी प्रासादिक भजन मंडळ, न्हावेलीचे बुवा सूरज पार्सेकर आणि गोठण प्रासादिक भजन मंडळ, वजराठचे बुवा सोमेश वेंगुर्लेकर सहभागी होणार आहेत.

 

स्पर्धेतील विजेत्या भजन मंडळांना आकर्षक रोख पारितोषिके व सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत. तसेच सर्व सहभागी मंडळांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. भजन सादरीकरणातील विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी वैयक्तिक व सांघिक पुरस्कारांसह उत्कृष्ट जुगलबंदी या विशेष पुरस्काराचाही समावेश करण्यात आला आहे.

 

या कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे प्रेक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेला मोफत लकी ड्रॉ. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून, भजन स्पर्धेच्या शेवटी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.

 

या राज्यस्तरीय भजन स्पर्धेचा लाभ परिसरातील भजनप्रेमी, भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घ्यावा, असे आवाहन श्री देवी माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, आरोस यांच्या वतीने करण्यात आले आहे.