चिपळूण (प्रतिनिधी) : सह्याद्रि शिक्षण संस्थेचे प्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी सती विद्यालयात शारदोत्सव उत्साहात झाला. प्रथमतः विधीवत विद्येची देवता माता शारदेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर प्रत्येक वर्गामध्ये पाटीपूजन करण्यात आले. सामूहिक आरती व परिपाठाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी नवरात्रोत्सवाबद्दल शास्त्रीय व धार्मिक माहिती कथन विद्यालयाच्या शिक्षिका विनया नटे यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये लहान गटातुन कु .प्रचिती शिवाजी झुजम तर मोठ्या गटातून – कु सुयश संतोष सोलकर या विद्यार्थ्यांना वाचक वीर पुरस्काराने गौरवण्यात आले. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांचे वर्गवार विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.यानंतर विद्यालयाचे शिक्षक संदेश सावंत यांनी बोधपर कथा सांगून सर्व विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांनी वर्गवार इंग्रजी संवादाचे उत्तम सादरीकरण केले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या प्रांगणात सामूहिक दांडिया सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी आरती व प्रसाद वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वर्गवार भोंडला स्पर्धेत लहान गटामध्ये प्रथम इ. २ री स्कॉलर , द्वितीय १ ली स्कॉलर व फायटर, तृतीय १ली चॅम्पियन तर मोठ्या गटांमध्ये प्रथम ३ री स्कॉलर , द्वितीय ४थी फायटर, तृतीय ३री फायटर व ४थी चॅम्पियन या वर्गांनी विजयी होण्याचा मान मिळवला.
देवीच्या दर्शनासाठी विस्ताराधिकारी श्री. शिगवण यांनी या कार्यक्रमाला भेट दिली व विद्यार्थ्याना शारदोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच प्राथमिक शाळा दळवटणे बागवाडीच्या मुख्याध्यापिका सौ.आकांक्षा सकपाळ, सौ इंगावले, सौ. घडशी, सौ.कदम, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ. अपूर्वा शिंदे यांनी केले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक अरविंद सकपाळ, शिक्षिका मनिषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत, अपूर्वा शिंदे, विनया नटे, वृषाली राणे, अर्चना देशमुख, रूपाली खरात, ज्योती चाळके, वर्षा सकपाळ, शितल पाटील, स्वरा भुरण, विजया मौजे, विनोद उदेग, एकनाथ चाळके, अनिता तांबिटकर यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.













